मतदान करण्यापूर्वी पहा उमेदवाराची संपूर्ण ‘कुंडली’, निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी नवीन सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांसाठी मोठी सुविधा सुरू केली आहे. ‘ई-सीआयनेट’ या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी नोंदी, मालमत्ता आणि इतर महत्त्वाची माहिती सहज पाहता येणार आहे.

निवडणूक आयोगाने 15 मार्च रोजी आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांतील 8 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. 9 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी आसाम, केरळ आणि पुडुचेरी येथे एकूण 1,955 उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगाल (पहिला व दुसरा टप्पा) आणि तामिळनाडू येथे उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) साठी 9 एप्रिल, तर पश्चिम बंगाल (दुसरा टप्पा) साठी 13 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे.

‘ई-सीआयनेट’वरील ‘आपल्या उमेदवाराला जाणून घ्या’ (KYC) या विभागातून मतदारांना उमेदवारांची सविस्तर माहिती मिळणार आहे. यामध्ये गुन्हेगारी प्रकरणे, मालमत्ता व देणी, शैक्षणिक पात्रता तसेच अधिकृत सामाजिक माध्यम खाती यांचा समावेश आहे. तसेच उमेदवारांनी सादर केलेले संपूर्ण शपथपत्र (फॉर्म-26) डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

हा प्लॅटफॉर्म जगातील सर्वात मोठ्या निवडणूक सेवा प्रणालींपैकी एक मानला जात असून हिंदुस्थानातील सर्व निवडणूक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो. यात निवडणूक आयोगाच्या 40 हून अधिक अ‍ॅप्स आणि संकेतस्थळांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

या माध्यमातून मतदार नोंदणी, मतदार यादी शोध, अर्जाची स्थिती तपासणे, निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे, बीएलओकडून कॉल बुक करणे, ई-मतदार ओळखपत्र डाउनलोड करणे, मतदानाचे कल पाहणे आणि तक्रार निवारण यांसारख्या सुविधा मिळणार आहेत.

याशिवाय, आचारसंहिता उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी ‘सी-विजिल’ हे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर दिव्यांग मतदारांसाठी ‘सक्षम’ अ‍ॅपद्वारे विशेष सुविधा पुरवल्या जात आहेत.