इकोफ्रेंडली सेट एकदम टकाटक; चित्रपट-मालिकांच्या शूटिंगदरम्यान अभिनव प्रयोग 

एरव्ही भव्यदिव्यतेमुळे चर्चेत असलेले चित्रपट आणि मालिकांचे सेट आता एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहेत. शूटिंगदरम्यान सेटवर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. आगामी टकाटक 2 या चित्रपटासाठी चक्क कागद, रिसायकल साहित्य, भंगार, गवतापासून पर्यावरणपूरक सेट तयार केले होते, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाच्या सेटवरही प्लॅस्टिक फ्री ही मोहीम राबवली होती.

निसर्गासोबत राहून आपण काम केल्यास निसर्गही आपल्यास साथ देतो. अशा विचाराने प्रेरित कला दिग्दर्शक सुमित पाटील ‘टकाटक 2’साठी पर्यावरणपूरक सेट बनविले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनव प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाकाऊपासून टिकाऊ 

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे सेटवरील पिण्यासाठी वापरण्यात  येणाऱया प्लॅस्टिकच्या बाटल्या एकत्र जमा करतात. त्यानंतर जमा झालेल्या बाटल्या त्या दादरमधील ’ग्रीन इनिशिएटिव्ह’ या संस्थेला देतात. प्लॅस्टिकच्या या निरुपयोगी बाटल्यांपासून इंधननिर्मिती केली जाते किंवा बागेत सुशोभीकरणासाठी वापरल्या जातात.

प्लॅस्टिक मुक्त सेट

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानदेखील असाच काहीसा हटके प्रयोग केला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकही प्लॅस्टिकची बाटली वापरली नव्हती. त्याऐवजी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पिण्याच्या पाण्यासाठी मेटलच्या बाटल्यांचा वापर केला.

पर्यावरणाला हानी न पोहचवता सेट डिझाईन करण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यामुळे कळत नकळत निसर्ग आणि पर्यावरण याबाबत जागरुकता होत होती. एका वेगळ्या विषयाच्या चित्रपटाला अशा पर्यावरणपूरक सेटने नक्कीच वेगळा रंग येईल यात शंका नाही.
– सुमीत पाटील, कलादिग्दर्शक