हिंदुस्थान 10 वर्षे मागे जाणार! ‘कोरोना’मुळे गरिबी, बेरोजगारीचा स्फोट होणार

1899

‘कोरोना’ व्हायरसचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करावा लागला. यामुळे अर्थव्यवस्थेचे चाक थांबले आहे. याची मोठी किंमत अर्थव्यवस्थेला मोजावी लागणार असून, हिंदुस्थान 10 वर्षे मागे जाईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) अहवालात व्यक्त केला आहे. यातील सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे गरिबी, बेरोजगारीचा स्फोट होईल. सध्या देशातील 81 कोटी जनता दारिद्रय़ रेषेखाली आहे. यामध्ये तब्बल 10 कोटींची भर पडेल. मध्यमवर्गीय, निम मध्यमवर्गीयांचे उत्पन्न झपाटय़ाने घटेल, असेही यात म्हटले आहे.

कोरोनाने 200 देशांमध्ये प्रार्दूभाव केला आहे. महासत्ता अमेरिकेत तर हाहाकार माजविला आहे. अनेक देश लॉकडाऊन झाल्यामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेलाच मोठा फटका बसला असून, हिंदुस्थानलाही जबर किंमत चुकवावी लागणार आहे. ‘युनो’तील संशोधकांनी जागतिक बँक आणि इतर माध्यमांच्या आधारे एक अहवाल तयार केला असून, यातील भविष्यातील भयंकर आर्थिक संकटांची माहिती दिली आहे.

कोरोना, लॉकडाऊनचे काय होणार परिणाम
– जागतिक बँकेने (वर्ल्ड बँक) निश्चित केलेल्या दारिद्रय़ रेषेच्या निकषानुसार (पॉवर्टी लाईन) प्रतिदिन 3.2 डॉलरपेक्षा कमी (सुमारे 245 रुपये) कमवणारी व्यक्ती दारिद्रय़ रेषेखाली मानली जाते. हिंदुस्थानात सध्या 60 टक्के लोकसंख्येचे म्हणजे 81.20 कोटी जनता दारिद्रय़ रेषेखाली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यात 10.40 कोटी लोकांची भर पडेल. म्हणजे तब्बल 68 टक्के जनतेला दारिद्रय़ रेषेखाली जीवन जगावे लागेल.
– जागतिक बँक जनतेच्या उत्पन्नानुसार संबंधित देशांचा समावेश त्या श्रेणीमध्ये करते. यासाठी चार श्रेणी आहेत. हिंदुस्थानचा समावेश अल्प-मध्यम उत्पन्नाच्या श्रेणीमध्ये आहे. देशातील जनतेचे दरडोई वार्षिक सरासरी उत्पन्न 78438 ते 3 लाख रुपये असल्यास या श्रेणीत समावेश होतो.
– कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल. दारिद्रय़ रेषेखालील लोकांचे दरडोई दररोज केवळ 145 रुपयांपर्यंत खाली येईल.

आपली प्रतिक्रिया द्या