घरात 17 तास झडती, 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त; ईडीने चावी बनवून घेतली, टाळे उघडले

वसईतील दीनदयाळ नगर येथील अनिलकुमार पवार यांच्या शासकीय बंगल्यावर मंगळवारी पहाटे ईडीने छापेमारी केली. पवार यांनी दार उघडलेच नाही. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. तासभर वॉर्निंग दिल्यानंतरही पवार दार उघडत नसल्याने स्थानिक चावीवाल्याला बोलावून चावी बनवून दिली. त्यानंतर घराचे टाळे उघडून ईडीचे अधिकारी घरात धडकले.

अधिकाऱ्यांनी पवार यांची कसून चौकशी केली आणि घराची झडतीही घेतली. यावेळी त्यांनी 1 कोटी 32 लाखांची रोकड व काही आक्षेपार्ह कागदपत्र जप्त केल्याचे सांगण्यात आले. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर मध्यरात्री दीड वाजता ईडीचे अधिकारी व त्यांचे पथक पवार यांच्या बंगल्याबाहेर पडले.

डेटा डिलीट केल्याचा संशय 

ईडीचे अधिकारी दारात येऊनही पवार यांनी तब्बल एक तास दार उघडले नाही. या काळात त्यांनी मोबाईल आणि लॅपटॉपमधील काही महत्त्वाचा डेटा डिलीट केला असल्याचा संशय ईडीला आहे. त्याचीही  पडताळणी करण्यात येणार आहे.

रेड्डीने तोंड उघडताच पवार अडकले

बेकायदा इमारतींप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला झोडपून काढत या इमारती तत्काळ जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. या प्रकरणानंतर वसई-विरार महापालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीच्या धाडी पडल्या. त्यात 32 कोटींची बेनामी मालमत्ता सापडली. त्यांची ‘कसून’ चौकशी झाल्यानंतर त्यांनी तोंड उघडले आणि आयुक्त पवार अडकले.

धाडसत्रानंतर वसईत फटाके फुटले

अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर वसई-विरारकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. पवार यांच्या कार्यकाळात मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळे झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. भूमिपुत्र फाऊंडेशनने पवार यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी यासाठी आवाज उठवला होता. यावेळी भूमिपुत्र फाऊंडेशनने पेढे वाटून आणि फटाके वाजवून आनंद साजरा केल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले.