उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या डॉ. दीपक देशमुख यांच्या घरावर शुक्रवारी सकाळी ईडीने धाड टाकली. त्यामुळे शरण आलेल्यांना अभय आणि न येणाऱ्यांना भय ही स्ट्रटेजी भाजपने सोडली नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
ईडी, सीबीआयच्या कारवायांमुळे जनमानसात भाजपविषयी तिरस्काराची भावना वाढली असून, लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला धडा शिकवून हे दाखवून दिले आहे. तरीही भाजपचा पीळ कायम असल्याचे आजच्या घटनेतून दिसून आले. कोरोना काळात मृत पावलेल्या रुग्णांना जिवंत दाखवून, त्यांच्यावरील उपचारासाठीचे कोटय़वधीचे सरकारी अनुदान लाटले गेल्याची तक्रार आमदार जयपुमार गोरे यांच्याविरोधात मायणी (ता. खटाव) येथील डॉ. दीपक देशमुख यांनी वडूज पोलीस ठाण्याकडे पुराव्यांसह केली होती; परंतु पोलिसांकडून कसलीही कारवाई न झाल्याने अलीकडेच त्यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या अनुषंगाने आमदार गोरे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याऐवजी तक्रारदाराच्याच मागे भुंगा लावण्याचा प्रकार ईडीच्या धाडीतून पुढे आला आहे.
डॉ. दीपक देशमुख यांच्या मायणी येथील घरावर ईडीने शुक्रवारी सकाळी सात वाजता धाड टाकली. यावेळी डॉ. देशमुख घरी नव्हते. घरात केवळ महिला व लहान मुले असताना ईडीच्या झोन-2 मुंबई कार्यालयातून ईडीचे दोन उच्च अधिकारी व पेंद्रीय राखीव पोलीस दलाचे 22 जवान सकाळी सात वाजता त्यांच्या घरी धडकले. दीपक देशमुख पुठे आहेत, हिंमत देशमुख पुठे आहेत ते सांगा नाहीतर तुम्हालाच तुरुंगात टाकतो, अशी दमदाटी त्यांनी सुरू केली. दिवसभर या पथकाकडून घरात कागदपत्रांची झाडाझडती सुरू होती.
गोरेंच्या सांगण्यावरून खोटी कारवाई
जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या कुटुंबाविरोधात खोटी कारवाई केली आहे. पण, कितीही कारवाई केली तरी आम्ही शांत बसणार नाही. कोरोना काळात मृत व जिवंत रुग्णांच्या नावाने सरकारकडून खोटय़ा पद्धतीने अनुदान लाटणाऱ्या जयकुमार गोरे यांच्या विरोधात आम्ही कुटुंबीय मरेपर्यंत लढा देत राहू, असे देशमुख कुटुंबातील एका सदस्याने सांगितले.