राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचे समन्स; सीजे हाऊस प्रकरणी होणार चौकशी

816

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. सीजे हाऊसमधील संपत्तीबाबत त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. सीजे हाऊसमधील संपत्ती कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा निकटचा सहकारी इक्बाल मिर्चीची असल्याचा ईडीचा दावा आहे. इक्बाल मिर्चीच्या या इमारतीत प्रफुल्ल पटेल यांचे दोन फ्लॅट असल्याचे ईडीने म्हटले आहे. ही संपत्ती विकसीत करण्यासाठी 2007 मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्याचेही ईडीने म्हटले आहे.

डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार असणाऱ्या इक्बाल मिर्चीचा 2013 मध्ये मृत्यू झाला आहे. सीजे हाऊसमधील संपत्ती विकसीत करण्यासाठी इक्बाल मिर्ची आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात करार झाल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. या करारावर प्रफुल्ल पटेल यांनी सहमालक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सीजे हाऊसमधील दोन फ्लॅट प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर आहेत. इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाने 2007 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅट प्रफुल्ल पटेल यांच्याकडे हस्तांतरीत केले होते. दरम्यान, कोणतेही बेकायदा किंवा अयोग्य काम केले नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

मिलेनियम डेवेलपर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रफुल्ल पटेल शेअरहोल्डर असल्याचेही ईडीने म्हटले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जिल्हा सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना घाबरवण्यासाठीच भाजप दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या