नितीशबाबूंचा ‘भ्रम’निरास

चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर आता नितीशबाबू नोटाबंदीच्या प्रेमातून बाहेर पडले आहेत. चंद्राबाबूदेखील एकेकाळी नोटाबंदीचे समर्थकच होते. मात्र अलीकडे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाहीतूनच ते बाहेर पडले आणि ही सोडचिठ्ठी देताना त्यांनी जी महत्त्वाची कारणे सांगितली त्यात नोटाबंदीचे अपयश हेदेखील एक कारण होते. आता नितीशकुमार यांनीही बँकांच्या भूमिकेवर खापर फोडत का होईना, नोटाबंदीच्या लाभहानीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि चंद्राबाबूंचीच री ओढली. ‘भ्रम’निरास झालेल्या नितीशबाबूंनी उद्या चंद्राबाबूंच्या सुरात सूर मिसळले आणि पावलावरही पाऊल टाकले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही.

नोटाबंदीचा फायदा किती लोकांना झाला, असा प्रश्न आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनादेखील पडला आहे. हे तेच नितीशकुमार आहेत ज्यांनी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे लगेच जाहीर समर्थन केले होते. मुख्य म्हणजे, बिहारमध्ये त्या वेळी नितीशकुमार-लालूप्रसाद यादव यांचे आघाडी सरकार होते. भाजपचा दारुण पराभव करून या दुकलीने तेथे सत्ता स्थापन केली होती. लालू यांच्यासह सर्व विरोधी पक्ष नोटाबंदीविरोधात एकजुटीने उभे ठाकले होते. तरीही नितीशकुमार यांनी नोटाबंदीला जाहीर पाठिंबा दिला होता. ‘मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय धाडसी आहे. आगामी काळात देशाला त्याचा फायदाच होईल,’ अशा शब्दांत नितीश यांनी नोटाबंदीचे समर्थन केले होते. एवढेच नव्हे तर नोटाबंदी ही काळ्य़ा पैशांविरुद्ध लढाई आहे आणि म्हणूनच आपण या निर्णयाचे स्वागत केले, असे समर्थनही त्यांनी केले होते. एकदा, दोनदा नाही तर अनेकदा त्यांनी त्यांच्या नोटाबंदीप्रेमाचे दाखले दिले. मग आज अचानक नोटाबंदीचा फायदा किती लोकांना झाला, या प्रश्नाने ते हैराण का झाले आहेत? मागील दीड-दोन वर्षांत जो प्रश्न अनेकांना पडला तो आता नितीशकुमार यांनाही का पडला? खरे म्हणजे नोटाबंदीचा लाभ ना अर्थव्यवस्थेला झाला, ना सामान्य जनतेला. त्यामुळे ना

काळ्य़ा पैशाचा नायनाट
झाला, ना दहशतवाद-नक्षलवाद उखडला गेला, ना बनावट नोटा बनविणाऱ्या रॅकेटस्चे कंबरडे मोडले. या वस्तुस्थितीची कल्पना त्याच वेळी अनेकांना आली होती. त्यामुळेच त्यांनी नोटाबंदीला कडाडून विरोध दर्शवला होता. त्यात रद्द झालेल्या नोटा जमा करण्यासाठी बँकांबाहेर ज्या लांबच लांब रांगा सामान्य माणसांच्या लागल्या त्यात अनेकांचे नाहक जीव गेले. त्यामुळेही टीकेची धार वाढली होती. तरीही नोटाबंदीमुळे देशात अर्थक्रांती वगैरे झाल्याचे ढोल पिटले गेले. मात्र थोड्य़ाच दिवसांत नोटाबंदी म्हणजे एक सनसनाटी यापलीकडे काही नव्हते, अर्थक्रांतीचा दावा हे एक ‘आभासी सत्य’ होते हे आपोआपच स्पष्ट झाले. नोटाबंदीमुळे देशातील काळा पैसा बाहेर आला नाही हे ‘खरे सत्य’ रिझर्व्ह बँकेनेच नंतर मान्य केले. मात्र एवढे सगळे होऊनही कालपर्यंत नितीशकुमार यांनी नोटाबंदीच्या अपयशाबाबत एक शब्दही काढला नव्हता. रविवारी मात्र अचानक त्यांच्या या प्रेमाला ‘ओहोटी’ लागली आणि नोटाबंदीचा लाभ किती लोकांना झाला, हा प्रश्न त्यांनाही पडला. आता हा ठसका त्यांना आताच का आला, कसा आला, त्यामागेही काही ‘प्रश्न’ आहेत का, वगैरे गोष्टींबाबत स्वतः नितीशकुमारच बोलू शकतील. महत्त्वाचे इतकेच की, उशिरा का होईना,

नोटाबंदीच्या वास्तवाची जाणीव
त्यांना झाली आणि ती त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. आता भाजप सकारचा हा ‘भ्रमा’चा भोपळा फुटायला एवढा कालावधी का लागला असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात, पण हा भ्रमनिरास अनेकांचा झालाच आहे. आम्हीही सलग २५ वर्षे विचारांनी त्यांच्यासोबत राहिलो, पण आमचाही जेथे भ्रमनिरास झाला तेथे केवळ अपरिहार्य राजकीय तडजोड म्हणून सोबत गेलेल्यांचे वेगळे काय होणार? आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर आता नितीशबाबू नोटाबंदीच्या प्रेमातून बाहेर पडले आहेत. चंद्राबाबूदेखील एकेकाळी नोटाबंदीचे समर्थकच होते. मात्र अलीकडे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाहीतूनच ते बाहेर पडले आणि ही सोडचिठ्ठी देताना त्यांनी जी महत्त्वाची कारणे सांगितली त्यात नोटाबंदीचे अपयश हेदेखील एक कारण होते. आता नितीशकुमार यांनीही बँकांच्या भूमिकेवर खापर फोडत का होईना, नोटाबंदीच्या लाभहानीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि चंद्राबाबूंचीच री ओढली. ‘भ्रम’निरास झालेल्या नितीशबाबूंनी उद्या चंद्राबाबूंच्या सुरात सूर मिसळले आणि पावलावरही पाऊल टाकले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. नोटाबंदी काय किंवा एकूणच राज्यकारभार काय, ‘भ्रम’निरास झालेल्यांच्या संख्येत आणखी एकाची भर यानिमित्ताने पडली आहे.