विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करूनच परीक्षा रद्दचा निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

सध्या विविध शैक्षणिक संस्था, वसतीगृहे विलगीकरणासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यातच बहुतांशी विद्यार्थी हे त्यांच्या मूळ गावी परतले आहेत, अशावेळी परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास, त्यांची निवास व भोजन व्यवस्था या चिंतेच्या बाबी आहेत. असे केल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय कुलगुरुंच्या सूचनेनुसारच घेतल्याची माहिती आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. जर परीक्षेचा निर्णय घ्यायचा होता तर युजीसीने 29 एप्रिलाच का नाही सांगितले ? असा संतप्त सवालदेखील सामंत यांनी यावेळी उपस्थित केला.

अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून यासंदर्भात राज्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी वरील सवाल उपस्थित केले आहे. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घ्यायच्या असतील तर कन्टेटन्मेंट झोनमधील विद्यार्थी आणि गावी गेलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची, पेपर सेट करणे, पेपर तपासणी, विशेषतः कंन्टेटन्मेट झोनमधून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी क्वारंटाइन सुविधा कशी असेल?  असे अनेक प्रश्नही उपस्थित होताहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कुलगुरुंच्या सूचनेनंतरच परीक्षा रद्दचा निर्णय
विद्यार्थ्यांची परिस्थितीची माहिती कुलगुरूंना असल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या परीक्षा घेणे शक्य नसल्याच्या सूचना आम्हाला राज्यातील 13 विद्यापीठाच्या कुलगुरूंनी केल्या आहेत. तसेच परीक्षा घेण्याचे ठरवल्यास कंन्टेनन्मेट झोनमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, विद्यार्थ्यांनी अन्य जिल्ह्यातून परीक्षा देण्यासाठी कसे यायचे, या प्रश्नांबरोबरच परीक्षेचा पेपर कोण सेट करणार, पेपर कसे तपासणार यासारखे अनेक प्रश्नांची उत्तर यूजीसीने द्यावेत असेही सामंत यावेळी म्हणाले.

त्यावेळीच निर्णय का नाही?
राज्य सरकारने विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या असताना यूजीसीच्या नव्या मार्गदर्शक सूचनेद्वारे परीक्षा सप्टेंबरपर्यंत घेण्याचे निर्देश दिले आहेत. यूजीसीने 29 एप्रिलला प्रथम जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येच परीक्षा घेणे बंधनकारक केल्या असत्या तर आम्ही परीक्षेची तयारी केली असती. त्याचप्रमाणे या सूचनांसंदर्भात आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही तीन महिन्यात यूजीसीकडून कोणतेही उत्तर आले नसल्याची माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली.

एटीकेटीच्या विद्यार्थ्यानाही सरासरी गुण
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत 13 अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपला निर्णय सर्वानुमते राज्य सरकारला पाठविला आहे. ज्यामध्ये सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची शिफारस केली आहे. तसेच सरासरी गुण देऊनही जर एटीकेटीचा विद्यार्थी उत्तीर्ण होणार नसेल तर त्याला विशेष सवलत म्हणून ग्रेस मार्क देण्याची शिफारससुद्धा करण्यात आला असलल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

विरोधकांना टोला
कुलगुरुंशी चर्चा करत नाही, असा अपप्रचार सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र त्यावरही सामंत यांनी कडाडून टीका केली. राज्य सरकार सर्व निर्णय सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करूनच घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

आपली प्रतिक्रिया द्या