महागले अंडे, शंभरला डझन

कडाक्याच्या थंडीत अंडय़ांचा भाव चांगलाच वधारला आहे. अंडय़ांचा डझनचा भाव शंभरीवर पोहोचला आहे. थंड हवामानात कमी उपलब्धता आणि जास्त वापरामुळे मागणी-पुरवठय़ातील तफावत वाढली आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात अंडय़ांच्या किमती 98-100 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत, असे अंडी विव्रेत्या व्यापाऱयांनी सांगितले.

हिवाळ्यात अंडय़ांना जास्त मागणी असते. त्या तुलनेत पुरवठा कमी होतो. थंडीच्या दिवसांत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली अशा विविध राज्यांमध्ये अंडय़ांच्या वापरात वाढ झाली आहे. त्या तुलनेत उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली नाही, असे अंडी विव्रेता संघटनेचे मुंबई अध्यक्ष राजू शेवाळे यांनी स्पष्ट केले. सध्या थंड हवामान असलेल्या राज्यांमध्ये मागणी वाढल्याने अंडय़ांच्या पुरवठय़ात सुमारे 15 ते 20 टक्क्यांची घट झाली आहे. जर अंडय़ांची मागणी वाढतीच राहिली तर मुंबईत अंडय़ांच्या किमती आणखी वाढू शकतात. प्रति डझनचा भाव 108 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. सध्या मुंबई महानगर क्षेत्रात दररोज सुमारे 1.10 कोटी अंडय़ांची मागणी होत आहे, तर पुरवठा सुमारे 85 लाख अंडी इतका कमी झाला आहे. अंडय़ांच्या दरवाढीपासून जानेवारी महिन्यात दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत घाऊक किमती प्रति अंडी 7 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.