मच्छीमार बोटीतून ड्रग्जची तस्करी, आठ पाकिस्तानींना 20 वर्षांचा तुरुंगवास; विशेष एनडीपीएस न्यायालयाचा निकाल

मच्छीमार बोटीतून ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी आठ पाकिस्तानी नागरिकांना बुधवारी विशेष एनडीपीएस न्यायालयाने दोषी ठरवले आणि 20 वर्षांचा तुरुंगवास व दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तटरक्षक दलाने एप्रिल 2015 मध्ये गुजरातकडे चाललेली संशयास्पद बोट ताब्यात घेतली होती. त्यावेळी बोटीमध्ये तब्बल 232 किलोग्रॅम हेरॉईनचा साठा आढळला होता.

अलिबक्ष खशकेली, मकसूद मसिम, मोहम्मद बख्श नाथो, मोहम्मद अहमद मोहम्मद इनायत, मोहम्मद यूनुस हाजी मोहम्मद सुमार, मोहम्मद, यूसुफ अब्दुल्ला गगावानी, मोहम्मद गुलहसन मौलबक्श बलूच, गुलहसन मोहम्मद सिद्दिक अशी दोषी पाकिस्तानी नागरिकांची नावे आहेत. त्यांनी आपण मच्छीमार असल्याचा दावा केला होता. हा दावा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी अमान्य केला. आरोपींकडे मोठय़ा प्रमाणावर हेरॉइनने भरलेले ड्रम सापडले होते. ड्रग्जचा साठा, सॅटेलाइट फोन व जीपीएस नेव्हिगेटर जवळ का बाळगले, याचे उत्तर आरोपींनी दिले नाही. कुठलेही मच्छीमार अशी उच्च दर्जाची उपकरणे वापरत नाहीत. किंबहुना कोणताही देश मच्छीमारांना सॅटेलाइट फोन वापरण्यास मुभा देत नाही. यावरून आरोपी कटाचाच भाग असल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण न्यायाधीश बांगर यांनी नोंदवले.

नेमके प्रकरण काय?

21 एप्रिल 2015 रोजी तटरक्षक दलाचे अधिकारी गुजरातच्या राष्ट्रीय सागरी सीमारेषेवर ‘संग्राम’ जहाजात गस्त घालत होते. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास रडारने एक बोट अडवली. त्या बोटीवर कुठलाही झेंडा नव्हता. तटरक्षक दलाने ती बोट ताब्यात घेतली. त्यात आठ पाकिस्तानी नागरिक आढळले होते. त्यानंतर दुसऱया दिवशी बोट पोरबंदरला नेण्यात आली. तेथे बोटीतील ड्रममध्ये हेरॉईनचा साठा सापडला होता.