अंगडियाच्या कार्यालयातील दीड कोटी लुटणारे आठ जण गजाआड

सामना प्रतिनिधी । मुंबई

भुलेश्वर येथील एका अंगडियाच्या कार्यालयात घुसून १ कोटी १३ लाख ५० हजारांची रोकड लुटून नेणाऱ्या आठ जणांच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना पकडून पोलिसांनी ९३ लाख रुपये हस्तगत केले आहेत.

२९ मेच्या सकाळी भुलेश्वरच्या पोफळवाडीत असलेल्या एका अंगडियाच्या कार्यालयात तीन अज्ञात इसम घुसले. मग त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या तोंडात गुंगीचे औषध असलेला रुमाल कोंबून कार्यालयातील १ कोटी १३ लाख ५० हजारांची रोकड लुटून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योंगेंद्र पाचे, एपीआय दत्ता मसवेकर, दळवी, उपनिरीक्षक देसाई, सुदर्शन पाटील, महेश राळेभात, दत्तात्रय पाटील, चंदनकर आदींच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान अंगडियाच्या कार्यालयात काम करणारा रिपन पटेल यानेच मित्र भाविक पांचाळ याच्या मदतीने हा गुन्हा घडवून आणल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी त्या दोघांना अटक केली.

गोव्याच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलात मौजमजा
अंगडियाच्या कार्यालयात लुटमार करण्यासाठी रिपेन आणि भाविक यांनी त्यांच्या मित्र संजय ऊर्फ संतोष चौहान याच्या ओळखीतून अहमदाबाद येथील तरुणांना बोलावले होते. हे कळताच पोलिसांचे एक पथक अहमदाबाद येथे रवाना झाले. मात्र पाहिजे असलेले आरोपी गोव्यातील ग्रॅम्ड हयात या पंचतारांकित हॉटेलात मौजमजा करीत असल्याची कळताच पोलिसांनी ग्रॅण्ड हयात गाठून जिगर पटेल, नरेंद्र जादौन यांना अटक केली. तर दीपक भदोरिया या आरोपीला आग्रा येथून तर कल्लु शर्मा आणि पंकज प्रजापती या दोघांना अहमदाबाद येथे पकडले.

बहिणीच्या लग्नासाठी पैसे हवे म्हणून गुन्हा केला, पण हाती काहीच नाही
रिपेनला बहिणीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने भाविकला ही बाब सांगितली.भाविकने मग भांडुप येथे राहणारा सराईत गुन्हेगार संजयला याबाबत सांगितल्यानंतर अंगडियाचे कार्यालय लुटायचा कट शिजला. यासाठी संजयने अहमदाबाद येथील ओळखीच्या तरुणांना हाताशी घेतले. दोन-तीन वेळा रेकी केल्यानंतर आरोपींनी २९ मे रोजी काम फत्ते केले, पण पळून जाताना दीपक आणि संजय यांनी चोरलेल्या पैशांवर गुपचूप डल्ला मारला. त्यानंतर वाटणीचे पैसेही घेतले, पण रिपेनच्या हातात काहीच आले नाही. अखेर पाचे व त्यांच्या पथकाने शिताफीने तपास करीत आरोपींच्या मुसक्या आवळून चोरीची रक्कम हस्तगत केली.