काँग्रेसची ऑफर, भाजपचे क्रॉस वोटिंग; खडसेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

3058
eknath-khadse-phone

‘विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आपल्याला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. तसेच भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी देखील क्रॉस वोटिंग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते’, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. भाजपच्या निर्णयानंतर एकनाथ खडसे चांगलेच नाराज झाले आहेत. भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आल्यानंतर खडसे यांनी तोफ डागायला सुरुवात केली आहे.

एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरात वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना एक गौप्यस्फोट केला. ‘विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने ज्या इच्छुकांच्या नावांच्या शिफारशी केल्या होत्या, त्यात आता ज्या चार जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांची नावे नव्हती. त्यात माझ्यासह इतर तिघांची नावे होती. मात्र, निवड समितीने आमची नावे टाळून नव्या लोकांना उमेदवारी दिली. त्यावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. राज्यसभेच्या वेळी आम्हाला सांगण्यात आले होते की तुम्हाला आता नाही तर विधानपरिषदेवर संधी दिली जाईल. मात्र, आताही आमची नावे असताना आम्हाला संधी नाकारण्यात येऊन दगाफटका झाल्याचे, ते म्हणाले. तसेच संधी नाकारली याचे दुःख नाही. पण पक्षात अनेक निष्ठावान असताना ज्यांनी पक्षाला शिव्या घातल्या, पक्षविरोधी कारवाया केल्या, अशा लोकांना संधी दिल्याने वाईट वाटले. हा एकप्रकारे निष्ठावंतांवर अन्याय असल्याचे ही ते म्हणाले.

खडसे यांना पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाही त्यामुळे ते भलतेच संतापले आहेत. विधानसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेचेही तिकीट नाकारलेले एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या