पुण्यात ‘जय गुजरात’ म्हणत मिंधेंचे अमित शहांसमोर लोटांगण; महाराष्ट्रात संतापाची लाट

आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत. हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रातील जनतेने एकवटून राज्य सरकारला निर्णय रद्द करण्यास भाग पाडलं आहे. असे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेत संतापाची लाट उसळली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या हस्ते कोंढवा बुद्रुक येथील जयराज स्पोर्टस कन्व्हेंशन सेंटरच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी अमित शहांचं भरभरून कौतुक केलं. हिंदीत भाषणाचा शेवट करताना ‘जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात’अशी घोषणा दिली. अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेत संतापाची लाट उसळली आहे. अमित शहांना खूश करण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केली, तसेच पदरात काही पाडून घेण्यासाठी एकप्रकारे लोटांगण घातल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे.

‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’ उद्योजक सुशील केडियाची मुजोरी

सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये आमचा पक्ष सोडला, पक्षाचं जे काही केलं तेव्हा यांनी सांगितलं होतं की मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊन चाललो आहे, असा दावा केला होता. मात्र बाळासाहेबांचे विचार जय गुजरात कधीच होऊ शकत नाहीत. जय हिंद हे राष्ट्र प्रेम आहे, जय महाराष्ट्र हे राज्याबद्दलचं प्रेम आहे. पण जय गुजरात?? हे अमित शहांना खूश करण्यासाठी आणि त्यांच्या खूशमतीमध्ये जे काही मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी होतं, त्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.