मिंधे सरकार एकामागोमाग एक घोटाळे करत आहे. सरकारचा आणखी एक घोटाळा आज समोर आला. वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूंना 11 कोटी रुपयांचे बक्षीस मिंधेंनी जाहीर केले होते. मात्र विश्व चषक जिंकून जगामध्ये हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल करणाऱ्या क्रिकेटपटूंना हजारो कोटींची उधळपट्टी करणाऱ्या मिंधे सरकारने अद्याप फुटकी कवडीही दिली नसल्याची माहिती आहे.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने गेल्या जून-जुलै महिन्यात झालेली टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. संघातील महाराष्ट्राच्या चार खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी हिंदुस्थानी क्रिकेट संघातील मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार केला होता. तेव्हा ही घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना वाजतगाजत विधान भवनात आणूनही गौरवण्यात आले होते. तिथे संपूर्ण हिंदुस्थानी संघाला 11 कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले. मात्र यातील 1 रुपयाही गेल्या तीन महिन्यांत दिला गेलेला नाही.
दरम्यान, टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेनंतर दोन महिन्यांनी फ्रान्सच्या पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या स्वप्नील कुसळे याला 2 कोटी रुपये तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये गोळाफेक स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी याला 3 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यांच्या प्रशिक्षकांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. हंगेरीत सप्टेंबरमध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील पदक विजेत्यांनाही या वेळी रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
विधानभवनात विश्वविजेत्या संघातील कर्णधार रोहितसह चौघांचा सत्कार केला गेला. तेव्हा हिंदुस्थानी संघालाही 11 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा मिंधेंनी केली होती. मात्र हे पैसे अद्याप दिलेले नाहीत.
n वर्षा निवासस्थानी या क्रिकेटपटूंच्या बँक खात्यांची माहिती घेण्यात आली होती. बक्षिसाची रक्कम त्यांच्या खात्यांवर टाकण्यात येणार होती. परंतु अद्याप त्यांच्या खात्यात मिंधे सरकारकडून एक रुपयाही ट्रान्सफर झालेला नाही, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयात यासंदर्भात विचारले असता बक्षिसाचे पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.