
वर्षभरापूर्वी शिवसेनेशी गद्दारी करून भाजपाशी संधान साधलेल्या मिंधे गटात सध्या चलबिचल सुरू झाली आहे. भाजपने त्यांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून शिवसेनेतून पह्डले, पण अजूनही त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. शपथविधीसाठी शिवलेला नवा कोट धूळ खात पडला आहे. त्यातच अजित पवार गट सरकारला येऊन मिळाल्याने आता विस्तार होईल की नाही, मंत्री बनू की नाही अशा संभ्रमात मिंधे गटाचे आमदार अक्षरशः वेडेपिसे झाले आहेत. मळमळतोय मी… तळमळतोय मी… कधी होणार विस्तार? अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याकडे मिंधे गटाचे आमदार डोळे लावून बसले आहेत. पण काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांची एण्ट्री झाली आणि आपल्या स्वप्नांवर पाणी पडल्यासारखे त्यांना वाटले. कारण अजित पवार गटातील नऊ जणांचा पदार्पणातच शपथविधीही झाला. त्यामुळे मिंधे गटाची चांगलीच अडचण झाली आहे. मिंधे आमदार आता आपली नाराजी उघडउघड जाहीर करत आहेत.
भरत गोगावले आणि संजय शिरसाट या मिंधे गटातील आमदारांची मंत्रिपदाची अपेक्षा कधीच लपून राहिली नव्हती. सद्यस्थितीत दोघेही प्रचंड नाराज आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपल्या भावना उघड केल्या. आम्ही दोघेही मंत्रिपदासाठी शर्यतीत आहोत, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
आता कुर्बानीसाठीही काही शिल्लक उरलेले नाही
अजित पवारांसाठी तुम्ही कुर्बानी देण्यासाठी तयार आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना गोगावले यांनी आपली उद्विग्नता मांडली. आतापर्यंत बरेच काही दिले. आता कुर्बानीसाठीही काही शिल्लक उरलेले नाही, असे ते म्हणाले. लवकरात लवकर विस्ताराची घोषणा झाली नाही तर ठोस भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा ना विस्ताराबद्दल!
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून दोन दिवसांत विस्तार होईल अशी अपेक्षा यावेळी शिरसाट यांनी व्यक्त केली. याबरोबरच तुम्हीच विचारा ना मुख्यमंत्र्यांना असे सांगत त्यांनी माध्यमांनाही विनंती केली. अजित पवारांना अर्थ खाते मिळणार अशा माध्यमांच्या प्रश्नावर शिरसाट अक्षरशः वैतागले. मीडियावालेच खातेवाटप करून आम्हाला अडचणीत आणतात, असे ते म्हणाले.
दिवसभर नुसती चर्चा
आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि मगच खाते वाटप अशी भूमिका शिंदे व भाजपच्या आमदारांनी घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा आज दिवसभर होती. त्याचवेळी नाराजी वाढू नये म्हणून विस्ताराच्या पुडय़ा सोडण्यात आल्याचेही काहींचे म्हणणे होते.
































































