गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद रोजगारामुळे संपेल; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

675

राज्याचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शनिवारी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला. त्यांनी गडचिरोलीत येऊन जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेतला. मागील दोन महिन्यांसाठी पालकमंत्रीपद विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपवण्यात आले होते. ते शनिवारी शिंदे यांनी स्वीकारले. जिल्ह्यात रोजगार निर्मिती झाल्यास नक्षलवादाची समस्या संपेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीत येऊन विविध विभागप्रमुखांशी संवाद साधला. जिल्ह्यातीलकोरोना परिस्थिती जाणून घेतली. बदली होऊनही जे अधिकारी-कर्मचारी जिल्ह्यात रुजू होत नाही, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आदिवासींच्या वनजमीनीचा विषय तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना देतानाच त्यांनी जिल्ह्याला विकासात अग्रेसर करण्याची भूमिका व्यक्त केली. प्रामुख्याने रोजगार वाढीच्या संदर्भात या जिल्ह्याला प्राधान्य द्यावे लागेल. रोजगार प्राप्त झाल्यास तरुणाई नक्षलवादाकडे वळणार नाही. रोजगाराच्या माध्यमातून या गंभीर समस्येचा खात्मा होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या