नवरात्रोत्सवापूर्वी एकवीरा गडावर सुविधा द्या!

591

महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवीच्या गडावर नवरात्रोत्सवापूर्वी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्या, असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी पुरातत्व विभागाला दिले. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून रखडलेल्या विविध विकासकामांना खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. भक्तांची मोठी सोय होणार असून गडावरील पायऱ्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची टाकी, सुरक्षारक्षकांची नियुक्ती, जनरेटरची सुविधा आदी कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.

लोणावळा-कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून रोज असंख्य भाविक जात असतात. मात्र पुरेशा सुविधा नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवसेना उपनेते व एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांना निवेदन दिले. कार्ल्याची लेणी व एकवीरा देवीचा गड केंद्रीय मंत्रालयाकडे असल्याने राज्यात दुरुस्तीची व विकासाची कामे करताना प्रचंड त्रास होतो. अनंत तरे यांनी ही बाब डॉ. नीलम गोऱहे यांच्या निदर्शनास आणताच  त्यांनी तातडीने आपल्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली.

20 वर्षांचा ‘डेडलॉक’ निघाला

देवस्थानच्या विकासात केंद्रीय आणि राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे काही अडथळे दूर झाले आहेत. परवानगीअभावी रखडलेला देवस्थानचा 20 वर्षांचा ‘डेडलॉक’ निघाला आहे. एकवीरा देवस्थानमध्ये विजेसाठी 20 वर्षे जनरेटरची परवानगी मिळाली नव्हती, त्यासह आता अनेक परवानग्या मिळाल्या आहेत. यातून राज्यातल्या देवस्थानच्या विकासाची महायात्राच सुरू होईल- डॉ. नीलम गोऱहे

 

आपली प्रतिक्रिया द्या