राजकीय पक्षांच्या कार्यालयात फॉर्म भरल्यास कठोर कारवाई, निवडणूक आयोगाचा इशारा; ‘दुबारा’च्या शोधासाठी ‘फोटो सिमिलर एन्ट्रीज’चा उपयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात एसआयआर कार्यक्रम सध्या सुरू आहे, पण राजकीय पक्षांच्या कार्यालयात कॅम्प आयोजित करून गणना अर्ज (फॉर्म) भरल्यास गंभीर कारवाईचा इशारा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी दिला आहे. मतदारांचा पत्ता शोधण्यासाठी राजकीय पक्षांनी अधिकृतरीत्या नेमलेल्या बीएलएची मदत घेता येईल, पण राजकीय पक्षाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने मदत किंवा हस्तक्षेप करू नये असे निर्देश जारी केले आहेत. केंद्रीय आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात एसआयआर कार्यक्रम सुरू आहे. सुधारित वेळापत्रकानुसार घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेण्याच्या कार्यक्रमाला 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ आहे.

बीएलओ प्रत्येक मतदाराच्या घरी एकदा तरी भेट देणे आवश्यक आहे. जे घर बंद असेल त्या घरी किमान तीन वेळा भेट देणे आवश्यक आहे व त्याच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे.

राज्य निवडणूक कार्यालयाने ‘एनआयसी महाराष्ट्र’च्या मदतीने फोटो सिमिलर एन्ट्रीजच्या आधारे दुबार नावांच्या याद्या, यादीतील अस्पष्ट व अप्रमाणित फोटो असलेल्या मतदारांच्या याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

कॅम्प लावण्यास मनाई

शहरी भागात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी एकाच ठिकाणी बसून फॉर्म भरून घेत आहेत, पण मतदार यादीमध्ये अचूक पत्ता नसल्यास घरोघरी जाण्यास अडचण येऊ शकते. अशावेळी सर्वसाधारण संबंधित मतदान केंद्रामध्ये किंवा सोसायटीच्या आवारात किंवा सार्वजनिक, शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी बीएलओंनी बसून अचूक पत्ते घेणे अपेक्षित आहेत. त्यानंतर मतदाराच्या घरी जाऊन फॉर्म भरून घ्यायचे आहेत, अन्यथा मतदार संबंधित ठिकाणी राहतात याची खात्री करता येणार नाही. मात्र फॉर्म भरून घेण्यासाठी राजकीय पक्षाच्या कार्यालयात कॅम्प आयोजित करू नये. निवडणूक आयोग निःपक्षपाती असल्याने अशा प्रकारे राजकीय पक्षाच्या कार्यालयात कॅम्प आयोजित केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल असा इशारा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी दिला आहे.