
नवी मुंबईच्या ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये असलेल्या 76 हजार दुबार नावांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या दुबार नावांमुळे आगामी निवडणुकीत मतदानाचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे ही दुबार नावे तातडीने हटवण्यात यावीत, असे निर्देश ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या नोंदणी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सत्ताधाऱयांनी सत्तेचा गैरवापर करून मतदार याद्यांमध्ये घुसवलेली ही नावे काढण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीने केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे.
ऐरोली विधानसभा क्षेत्रात 41 हजार तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात 35 हजार दुबार मतदार आहेत. यापैकी बहुतेक मतदारांची नावे या दोन्ही मतदारसंघांत आहेत. एका प्रभागात असलेल्या व्यक्तीचे नाव दुसऱया प्रभागातही टाकण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदार घोटाळा उघडकीस आणल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. ही नावे तातडीने वगळण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे जोरदार पाठपुरावा करण्यात आला. शेवटी या पाठपुराव्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी नवी मुंबईच्या मतदार यादीत असलेली दुबार नावे तातडीने कमी करण्याचे निर्देश ऐरोली आणि बेलापूरमधील मतदार नोंदणी यंत्रणेला दिले आहेत. ही नावे जर मतदार यादीत कायम राहिली तर आगामी निवडणुकीत मतदानाचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे ही नावे तातडीने कमी करण्यात यावीत, अशी सक्त ताकीदही निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी अधिकाऱयांना दिली आहे.
शिवसेनेने दिली होती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
फक्त नवी मुंबईतच नाही तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात दुबार नावे आहेत. ही नावे सत्ताधाऱयांनी सत्तेचा गैरवापर करून आणि प्रशासनावर दबाव आणून यादीत घुसवली आहेत. त्यामुळे ती तातडीने कमी करण्यात यावीत यासाठी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. मतदार यादीत लाखो दुबार मतदार असल्याचा गौप्यस्फोट राजन विचारे यांनी केल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
पालिका निवडणुकीपूर्वी कार्यवाही करा
नवी मुंबईच्या दोन्ही विधानसभा क्षेत्रात असलेली दुबार नावेही दोन्ही मतदारसंघांत आहेत. त्यामुळे मतदानाचा गैरवापर होण्याची मोठी शक्यता आहे. काही नावे दोन दोन प्रभागांत असल्याने त्याचा फटका विरोधकांना बसू शकतो. त्यामुळे ही दुबार नावे तातडीने कमी करण्यात यावीत. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीच ही नावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केली आहे.