खर्चाची मर्यादा वाढवा! सर्वच राजकीय पक्षांची मागणी

323

देशातील वाढत्या महागाईचा फटका राजकीय पक्षांना देखील बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाख रुपयांवरून 60 लाख रुपयांपर्यंत करण्याची मागणी राज्यातील काही प्रमुख राजकीय पक्षांच्या वतीने 18 सप्टेंबर रोजी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली जाणार आहे.

 निवडणूक आयुक्तांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळासाठी उद्या वेळ राखून ठेवला आहे. यावेळी निवडणूक आयुक्त राजकीय पक्षाच्या नेत्यांची मते व सूचना जाणून घेणार आहेत.

या भेटीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीतील खर्चाची 40 लाख रुपयांची मर्यादा किमान 60 लाख रुपये करण्याची मागणी काही प्रमुख राजकीय पक्षांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली जाणार आहे. सध्याची वाढती महागाई लक्षात व निवडणूक प्रचाराचे हायटेक तंत्र लक्षात घेऊन निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवा असे काही राजकीय पक्षांचे म्हणणे आहे.

सरकारी दराने जाहिरात प्रसिद्ध

निवडणूक रिंगणातील उमेदवाराची वैयक्तिक माहिती, दाखल असलेल्या गुह्यांची माहिती व संपत्तीचा तपशील प्रमुख दैनिकांमध्ये प्रसिद्ध करण्याची निवडणूक आयोगाची अट आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्याचा खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जातो. प्रमुख दैनिकांचा जाहिरातीचा दर महागडा असतो. जाहिरातींच्या दरांमुळे उमेदवाराचा खर्च वाढतो. त्यामुळे सरकारी जाहिरातींच्या दराने उमेदवारांच्या जाहिराती वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्याची तरतूद करावी, अशी सूचना निवडणूक आयुक्तांकडे केली जाणार आहे.

व्हिडीओ शूटिंग बघून खर्च लागतो

उमेदवाराच्या निवडणूक प्रचारसभा व प्रचार फेर्‍यांचे निवडणूक आयोगामार्फत शूटिंग होते. पुढे हे व्हिडीओ शूटिंग पाहून खर्चाचा तपशील काढला जातो. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ राखणे उमेदवारांना कठीण होते, असे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने होणार आहे.

दहा वर्षांपासून मर्यादा वाढली नाही

निवडणूक खर्चाची मर्यादा मागील दहा वर्षांपासून वाढलेली नाही. दुसरीकडे चहापासून वडापाव आणि जेवणाचा खर्च वाढला आहे. सौदीमधील इंधन संकटामुळे ऐन निवडणुकीच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची भीती आहे. सर्वच खर्च वाढत आहे. प्रचार साहित्याच्या छपाईचा खर्चही वाढत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या