लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने काढले आहेत. शासनाने यापूर्वीच्या आदेशान्वये 30 सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. परंतु, आता निवडणूक घेण्याचा निर्णय आणि प्रक्रिया सुरू झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीनेच राज्यातील 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचाही धुराळा उडणार आहे.
सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार राज्य स्तरावर निवडणुका सुरू होण्यामध्ये अ वर्गातील 42, ब वर्गातील 1716, क वर्गातील 12250 आणि ड वर्गातील 15435 मिळून 29 हजार 443 सहकारी संस्थांचा निवडणुकीमध्ये समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने पुणे शहरातील 828 आणि पुणे जिल्ह्यातील 2220 मिळून एकूण 3 हजार 48 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
प्राधिकरणाच्या आयुक्त डॉ. अनिल कवडे यांनी या निवडणुकांचे आदेश काढले आहेत. त्यानुसार उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीस स्थगिती दिलेली आहे, अशा सहकारी संस्था वगळून शासनाच्या आदेशान्वये सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, त्या टप्प्यापासून दि. 1 ऑक्टोबर 2024 पासून निवडणूक प्रक्रिया सुरू कराव्यात. अ आणि ब वर्गातील ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 2014 मधील तरतुदीनुसार तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेस्तव सादर करावा, असे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित आहे. त्याचवेळी सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रियादेखील सुरुवात असल्याने एकाच वेळी या दोन निवडणुका घेणे, तसेच राजकीयदृष्ट्या राज्यात असणारे विधानसभा निवडणुकीचे वातावरण लक्षात घेता या निवडणुका खरोखरच होतील का? याबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.