
राज्यभरातील सर्वसामान्य घरगुती वीजग्राहकांचे वीज बिल पुढील पाच वर्षे वाढतच राहणार आहे. महावितरणने बहुवार्षिक वीज दर निश्चितीचा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) सादर केला आहे. त्यामध्ये तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांच्या वीज शुल्कात 6-7 टक्के वाढीची मागणी केली आहे. महावितरणची सदर मागणी वीज आयोगाने मंजूर केल्यास आधीच महागाईच्या झळा सोसाणाऱ्यांना सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी चाट लागणार आहे.
पुढील पाच वर्षांत आपणाला किती महसुलाची गरज आहे. वीज शुल्क, स्थिर आकार किती असावा याबाबत वीज आयोगाची मंजुरी घेणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार महावितरणने 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांसाठी वीज दर निश्चितीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामध्ये तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या वीज शुल्कात वाढीची मागणी केली आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांच्या वीज शुल्कात सरासरी एक टक्का तर कृषीपंपाला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात सुमारे तीन टक्क्यांच्या वाढीची मागणी केली आहे. सामान्य घरगुती वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत असताना महावितरणने तीनशेपेक्षा जादा वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांच्या वीज शुल्कात मात्र कोणत्याही वाढीची मागणी केलेली नाही. दरम्यान, वीज आयोगाने याबाबत ग्राहकांकडून सुचना व हरकती मागवल्या आहेत.
स्थिर आकारही फुगणार
वीज ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या वीज बिलावर प्रत्येक महिन्याला स्थिर आकार लावला जातो. तो सर्वच ग्राहकांसाठी वाढवण्याची मागणी महावितरणने आपल्या प्रस्तावात केली आहे. घरगुती ग्राहकांना सध्या महिन्याला 90 रुपये स्थिर आकार द्यावा लागतो. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून तो 2024-25 पर्यंत 123 रुपये करण्याची मागणी आहे. तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांचा हा आकार पाचव्या वर्षी 136 रुपये तर पाचशे युनिट वापर असलेल्या ग्राहकासाठी 178 रुपये करावा असे म्हटले आहे.



























































