लॉकडाऊननंतर डोंबिवलीत ब्लॅकडाऊन; चार तास वीज खंडित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity-1

लॉकडाऊनमुळे सर्वांना सक्तीने घरी थांबावे लागत असताना मंगळवारी डोंबिवली चार तास ब्लॅकडाऊन झाली. रस्ते रुंदीकरण करताना जेसीबीचा धक्का मुख्य केबलला बसल्याने ती तुटली आणि वीजपुरवठा खंडित झाला. पूर्व आणि पश्चिम भागाला याचा फटका बसला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चार तासानंतर बिघाड दुरुस्त झाल्यानंतर दिलासा मिळाला.

पेंडसेनगर, गावदेवी संकुल व गोग्रासवाडी येथे सकाळी 8 वाजता वीजपुरवठा अचानक खंडित झाला. गोग्रासवाडी येथील बालाजी मंदिरजवळ ट्रान्सफार्मवर कावळा मरून पडल्याने वीज पडून मुख्य वीज वाहिनीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे पाथरली, गोग्रासवाडी, नामदेवपथ या भागात वीजपुरवठा दोन तास खंडित झाला होता. त्यातच पालिकेने रस्ते रुंदीकरण सुरू केले आहे. एका ठिकाणी रस्ते खणताना मुख्य केबलला धक्का बसला व त्या केबलमध्ये गटाराचे पाणी गेल्याने डोंबिवलीत तीन ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकाच्या त्रासात अधिकच भर पडली.

मागणी वाढल्याचा परिणाम
दिवसातले 22 तास घरगुती विजेचा वापर वाढल्याने मागणी वाढली आहे. यामुळे केबलमध्ये बिघाड होत असल्याचे कर्मचारी सांगतात. याबाबत डोंबिवलीचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना विचारले असता त्यांनी घरगुती विजेची मागणी वाढल्याने यंत्रणेवर ताण येत असल्याचे सांगितले. महावितरणचे कर्मचारी सतर्क असल्यामुळे थोड्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.