वीज मीटर रीडिंगची कटकट संपणार, उपनगरांतील साडेसात लाख ग्राहकांच्या घरी बसणार ‘स्मार्ट मीटर’

4406

उपनगरांतील सात लाख 66 हजार घरगुती वीज ग्राहकांच्या घरी स्वयंचलित ‘स्मार्ट वीज मीटर’ बसणार आहेत. लॉकडाऊनमध्ये घरगुती ग्राहकांच्या वीजवापराचे मीटर रीडिंग न झाल्याने बिलमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. वीज नियामक आयोगाने त्याची गंभीर दखल घेत घरोघरी जाऊन वीजवापराचे मीटर रीडिंग घेण्याची पद्धत हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्राहकांच्या वीजवापराचे आपोआप मीटर रीडिंग व्हावे म्हणून ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ला सात लाख, तर ‘टाटा पॉवर’ला 66 हजार स्वयंचलित ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यासाठीच्या भांडवली खर्चाला मंजुरी दिली आहे.

मुंबई उपनगरांत अदानी इलेक्ट्रिसिटीचे सुमारे 26 लाख वीज ग्राहक असून, टाटा पॉवरचे आठ लाख ग्राहक आहेत. त्यांना पुरवलेल्या विजेचे मीटर रीडिंग प्रत्येक महिन्याला घरोघर जाऊन घ्यावे लागते. तसेच हे रीडिंग वीज कर्मचारी घेत असल्याने अनेकदा चूक होऊन ग्राहकांना अवाच्या सवा वीज बिले पाठविली जातात. तसेच लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे सक्तीचे असल्याने तीन महिने सर्वच ग्राहकांचे मीटर रीडिंग बंद होते. त्यानंतर जूनमध्ये रीडिंग सुरू केले असून, ग्राहकांना वाढीव बिले आली आहेत. त्याची दखल घेत वीज आयोगाने विविध उपाययोजना सुचवितानाच स्वयंचलित ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यासाठी भांडवली खर्चाला मंजुरी दिली आहे. राज्यात सध्या महावितरणने आपल्या औद्योगिक ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविले आहेत.

असे होते मार्ट मीटर रीडिंग
पाच-सहा हजार रुपये किंमत असलेल्या ‘स्मार्ट मीटर’मुळे ग्राहकाच्या वीजवापराची इत्थंभूत माहिती रेडिओ प्रिक्वेन्सीच्या माध्यमातून संबंधित वीज कंपनीच्या मुख्य सर्व्हरपर्यंत पोहोचविली जाते. तसेच ग्राहकाचा कोणत्या वेळी किती वीजवापर होतो, याचीही माहिती वेळोवेळी सर्व्हरपर्यंत पोहोचते. त्यामुळे वीज बिलातील गोंधळाबरोबरच वीजचोरीलाही चाप बसतो.

आपली प्रतिक्रिया द्या