
बापू सुळे, मुंबई
अबब… महावितरण खरेदी करत असलेल्या विजेपैकी तब्बल 10 हजार कोटी रुपयांच्या विजेला ग्राहकांपर्यंत पोहचण्याआधीच पाय फुटत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महावितरणने घेतलेल्या एकूण विजेच्या 16-17 टक्के वीज वर्षाला टेक्निकल लॉसच्या रूपाने वाया जात आहे. त्याला वीज नियामक आयोगाची मंजुरी असल्याने सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र दिसत आहे, मात्र त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांच्या डोक्यावर पडत आहे. त्यांना प्रतियुनिटमागे सुमारे एक रुपयाचा भार सोसावा लागत आहे.
मुंबई शहर आणि उपनगराचा काही भाग वगळता राज्यातील तब्बल अडीच कोटी ग्राहकांना वीज पुरवण्याची जबाबदारी महावितरण या सरकारी वीज कंपनीवर आहे. त्यासाठी ग्राहकांची माग्णी विचारात घेऊन महावितरण वीज कंपन्यांकडून वर्षाला सुमारे 1 लाख 15 हजार दशलक्ष युनिट वीज खरेदी करते. ही वीज ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी वीजनिर्मिती केंद्रापासून उच्च दाब वीज वाहिन्यांच्या माध्यमातून महावितरणपर्यंत आणली जाते. त्यामध्ये सुमारे तीन ते सवातीन टक्के विजेचा टेक्निकल लॉस होतो, तर महावितरण वीज वितरण करत असताना वीजचोरी, तांत्रिक बिगाड, वीज वाहिन्यांचे जाळे मोठे असल्याने 13-14 टक्के विजेची गळती होते. त्यामुळे खरेदी केलेल्या एकूण विजेपैकी 16-17 टक्के म्हणजे सुमारे 15 हजार दशलक्ष युनिट वाया जात असून ग्राहकांपर्यंत केवळ एक लाख दशलक्ष युनिट वीज पोहचत असल्याचे वस्तव आहे. वहनहानी तीन टक्के आणि वितरणहानी 12 टक्के वीज आयोगाने मंजूर केली आहे. त्यामुळे ऑल इज वेल दिसत असले तरी वाया जाणाऱया विजेची किंमत ग्राहकांना चुकवावी लागत आहे.
मुंबईत वितरणहानी 5-7 टक्के
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी वीज वितरण करते. त्यांच्यासाठी उच्च दाब वीज वाहिन्यांमधून वीज आणत असताना तीन टक्के वहनहानी होत आहे, मात्र त्यांची वितरणहानी बेस्ट क्षेत्रात केवळ चार टक्के असून टाटा आणि अदानीची वितरण हानी पाच-सात टक्के आहे.
16-17 टक्के वहन आणि वितरण हानी ही कागदावर आहे, पण महावितरणची प्रत्यक्ष वीज गळती 30 टक्क्यांपर्यंत आहे. ती कमी दाखवण्यासाठी शेतकऱ्यांचा वीज वापर वाढवून दाखवला जात आहे. – प्रताप होगाडे, वीजतज्ञ




























































