‘2 जी’ घोटाळय़ाचा दुष्परिणाम अद्याप कायम, इंजिनीअरिंगचे आणखी 113 अभ्यासक्रम बंद

16

सामना प्रतिनिधी, मुंबई

2 जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि ‘4 जी’मध्येही होत असलेले संशोधन यामुळे टेलिकॉम क्षेत्राचा बाजार सध्या थंडावला आहे. त्याचा परिणाम उच्च शिक्षणातही दिसून येत असून यंदा इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन्स इंजिनीयरिंगचे आणखी 113 अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन्स इंजिनीयरिंगच्या 113 अभ्यासक्रमांना देशातील कोणत्याही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. त्यात 66 डिग्री अभ्यासक्रम, 47 डिप्लोमा आणि अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात इंजिनीयरिंगचे अभ्यासक्रम बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी गेल्या दोन वर्षांत याच शाखेचे 144 डिग्री आणि 116 डिप्लोमा अभ्यासक्रम बंद करण्यात आले होते.

5 जी आल्यास मागणी वाढण्याची शक्यता
सध्या टेलिकॉम क्षेत्रावर काही ठरावीक कंपन्यांचेच वर्चस्व आहे. तरीही ऑपरेशन्स, टेक्निकल मॅनेजमेंट आणि नेटवर्किंगसारखी या क्षेत्रातील कामे इतर कंपन्यांमध्येही होत आहे. त्यामुळे ‘5 जी’ आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्राला पूर्वीसारखी मागणी वाढू शकेल असे तज्ञांचे मत आहे.

पदवीधरांचा परदेशाकडे ओढा
टेलिकॉम क्षेत्राला पहिला फटका बसला तो टूजी घोटाळ्याचा. या घोटाळ्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये करीअर करण्यात बहुतांश विद्यार्थ्यांना रस राहिलेला नाही. गेल्या तीन वर्षांत या परिस्थितीत काहीच सुधारणाही झालेली नाही. इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन्स इंजिनीयरिंगची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुढील भवितव्यासाठी परदेशात जाणे पसंत केल्याचे इंजिनीयरिंग महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या