
सामना प्रतिनिधी । मुंबई
अकरावी ऑनलाईन प्रवेशातील गोंधळ सुरूच असून शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता जाहीर होणारी सर्वसाधारण गुणवत्ता यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. ऑनलाईन अर्ज केलेले लाखो विद्यार्थी या यादीकडे डोळे लावून बसले होते. मात्र ही यादी अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर झळकलेली नाही.
4 जुलैला अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली. त्यानंतर आज संध्याकाळी 7 वाजता सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. पण ही यादी जाहीर झालेली नाही. या यादीत अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्याचा क्रमांक त्याला समजणार आहे. आर्टेस, कॉमर्स सायन्ससह एमसीव्हीसीच्या विद्यार्थ्यांसाठी ही यादी झळकणार होती. यादी कधी प्रसिद्ध होणार याविषयी विद्यार्थ्यांना कोणतीच माहिती मेसेजद्वारे पुरविण्यात आलेली नाही. शिवाय प्रवेशाच्या वेबसाईटवरही कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. शिक्षण उपसंचालकही सर्वसाधारण यादीविषयी कोणतीही माहिती देण्यास उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेविषयी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.























































