
अमेरिकेतील उद्योगपती एलॉन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात तणाव निर्माण झाल्याने मस्क हे आता देशोधडीला लागतील असे बोलले जात होते, परंतु ट्रम्प यांच्या वादानंतरसुद्धा मस्क यांच्या संपत्तीत वाढ होत आहे. मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढल्याने मस्क यांच्या संपत्तीत 13.9 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयरच्या माहितीनुसार, मस्क यांची संपत्ती आता 356 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 76.2 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. टेस्ला 993.92 अब्ज डॉलर मार्केटकॅपसोबत जगातील सर्वाधिक व्हॅल्युबल ऑटो कंपनी आहे, तर जगातील सर्वात जास्त टॉप व्हॅल्युबल कंपन्यांच्या यादीत 11 व्या नंबरवर आहे. मायक्रोसॉफ्ट 3.513 ट्रिलियन डॉलरसह जगातील सर्वात जास्त व्हॅल्युबल कंपनी आहे. यानंतर एनवीडिया 3.478 ट्रिलियन डॉलर, ऍपल 3.045 ट्रिलियन, ऍमेझॉन 2.303 ट्रिलियन डॉलर आणि गुगलची पॅरेट कंपनी अल्फाबेट 2.114 ट्रिलियन संपत्ती आहे. मेटा प्लॅटफॉर्म, सौदी अरामको, ब्रॉडकॉम, टीएसएमसी आणि बर्कशायर हॅथवे या कंपन्या आघाडीवर आहेत.
वाद मिटणार का?
ट्रम्प यांच्या सरकारने इलेक्ट्रिक काहन खरेदी करण्यावर मिळणारी टॅक्समधील सूट घालवण्यासाठी एक विधेयक आणले आहे. जो बायडन सरकार नव्या ईव्ही खरेदीवर 7500 डॉलरची टॅक्स सूट देत होते. परंतु, ट्रम्प सरकारची ही सूट देण्याची तयारी नाही. या प्रस्तावाला मस्क यांचा विरोध आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या विरोधात केलेले वादग्रस्त ट्विट मस्क यांनी डिलिट केले आहे. परंतु, ट्रम्प हे हा वाद मिटवण्याच्या मनस्थितीत नाहीत.
टॉप 10 श्रीमंत
जगातील सर्वात जास्त श्रीमंताच्या यादीत फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सचे सीईओ मार्क झुकरबर्ग 245 अब्ज डॉलर्ससोबत दुसऱया नंबरवर आहेत. ऍमेझॉनचे जेफ बेजोस 238 अब्ज तिसऱया क्रमांकावर, लॅरी एलिसन 199 अब्ज चौथे, बिल गेट्स 176 अब्ज पाचवे, स्टीव्ह वॉल्मर 163 अब्ज सहावे, वॉरेन बफे 154 अब्ज आठवे, बर्नार्ड ऑर्नाल्ट 152 अब्ज नवव्या स्थानी, तर मुकेश अंबानी 105 अब्ज डॉलर्ससोबत 17 व्या आणि गौतम अदानी 84.8 अब्ज डॉलर्ससोबत 20 व्या क्रमांकावर आहेत.