अग्निशमन दलाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार; दहा जणांना ‘आयुक्त रजत’ सन्मान

आगीच्या दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकरांचे जीव वाचवणार्या मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील जीगरबाज तीन कर्मचारी-अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. तर दहा कर्मचारी-अधिकाऱ्यांचा ‘आयुक्त रजत’ पुरस्कार मिळाला आहे.

अंधेरी पश्चिम येथील ओम हिरा पन्ना मॉल येथे लागलेल्या भीषण आगीत स्वतःच्या जीव धोक्यात घालून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत  20 जणांचा जीव वाचवून आगही नियंत्रणात आणून शौर्य दाखवणार्या गोरेगाव अग्निशमन केंद्राचे वरीष्ठ केंद्र अधिकारी संतोष इंगोले यांच्यासह अग्निशामक सुनील देसले आणि अग्निशामक योगेश कोंडावार यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. मालाड आग दुर्घटनेत अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन  अधिकारी हरिश्चंद्र गिरकर यांचा सन्मान करण्यात आला आहे.

धारावीतील दुर्घटनेत अतुलनीय काम केल्याबद्दल के. आर. यादव यांचा तर पर्ह्ट येथील लेव्हल-3 च्या आगीत जीगरबाज कामगिरी केल्याबद्दल प्रमुख अनिशमन अधिकारी आर. एन. आंबुलगेकर, उपप्रमुख अधिकारी ए. जे. मिश्रा, डी. एस. पाटील, विभागीय अधिकारी इ. बी. माटले यांचा आयुक्त रजत पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवाय वांद्रे भारतनगर आग दुर्घटनेत अतुलनीय काम केल्याबद्दल उपप्रमुख अग्निशमन अधिकारी एस. डी.सावंत, एच. व्ही गिरकर आणि गोरेगावच्या आगीत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल विभागीय अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम संदीकर यांना ‘पालिका आयुक्त रजत’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  आयुक्त भूषण गगराणी यांनी पुरस्कार मिळालेल्या जिगरबाज   कर्मचारी, अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.