जम्मूतील डोडामध्ये सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत डोडामधील अस्सर येथे सर्च ऑपरेशनचे नेतृत्व करताना हिंदुस्थानी लष्कराच्या 48 राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन दीपक सिंह यांना वीर मरण आले. विशेष म्हणजे शहीद होण्यापूर्वी कॅप्टन दिपक सिंह यांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला.
शहीद कॅप्टन दीपक सिंह हिंदुस्थानी लष्कराच्या 48 राष्ट्रीय रायफल्समध्ये सिग्नल अधिकारी होते. त्यासोबतच कॅप्टन दीपक सिंह हे एक चांगले हॉकीपटूही होते. डोडामधील अस्सर येथे लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणाऱ्या क्विक रिअॅक्शन टीमचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. ते एक उत्कृष्ट खेळाडू होतेच, त्याचबरोबर देशाची सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले. लढवय्या बाणा असल्यामुळेच त्यांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आणि त्यानंतर प्राण सोडले.
डोडा जिल्ह्यात मागील महिन्यात राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) च्या जवानांनी डोडो शहरापासून सुमारे 55 किमी अंतरावर असलेल्या देसा जंगल परिसरात असणाऱ्या धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. शोध मोहिमेदरम्यान लष्कराची दहशतवाद्यांची जोरदार चकमक झाली होती. या चकमकीत काही अधिकाऱ्यांसह पाच जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.