अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

378

जम्मू कश्मीरच्या अनंतनागमध्ये सोमवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. या कारवाईत सीआरपीएफ,क्विक अॅक्शन टिम, पोलीस आणि 3 राष्ट्रीय रायफल्सचे जवान सहभागी झाले होते. कश्मीरमध्ये सुरक्षा दलाने ऑपरेशन ऑल आऊटला गती दिली आहे.

अनंतनागमधील श्रीगुर्फवारा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या भागात शोधमोहिम हाती घेतली. दहशतवादी लपल्याची शक्यता असलेल्या भागाला घेराव टाकण्यात आला. सुरक्षा दलाने घेरल्याचे समजल्यावर सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाने परिसराची नाकाबंदी करून शोधमाहिम सुरू केली आहे.

कलम 370 रद्द करण्याच्या घटनेला 5 ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याआधी जम्मू कश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. त्यामुळे सुरक्षा दलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी बारामुल्लातील सोपोरमध्ये सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तसेच त्यांच्याकडून एके 47 रायफल आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या