क्रिकेट खेळताना मैदानावरच चक्कर आल्याने एका अभियंत्याचा मृत्यू झाला. मात्र, ज्या ठिकाणी मृत्यू झाला, या हद्दीबाबत रावेत आणि निगडी पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखविले. अखेर तब्बल साडेचार तासांनी पोलिसांनी पंचनामा केला.
अभिजीत चौधरी (रा. रूपीनगर, तळवडे) असे मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. अभिजीत हे कंपनीतील आपल्या मित्रांसोबत शनिवारी क्रिकेट खेळण्यासाठी प्राधिकरणात गेले होते. मात्र, मैदानावर ते चक्कर येऊन पडल्याने त्यांना निगडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाने निगडी पोलिसांना कळविले.
निगडी पोलिसांनी ही हद्द रावेत पोलिसांची असल्याचे नातेवाइकांना सांगितले. रावेत पोलीस घटनास्थळी आले. मात्र, त्यांनीदेखील घटनास्थळही आपल्या हद्दीला नसल्याचे सांगत निगडी पोलिसांकडे बोट दाखविले. त्यामुळे नातेवाईक पुन्हा निगडी पोलिसांकडे पंचनाम्यासाठी गेले असता, निगडी पोलिसांनी पुन्हा सदरची हद्द रावेतमध्ये येत असल्याचे सांगितले.
काही कार्यकर्त्यांनी अखेर पोलिसांशी संपर्क साधला. रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे हे स्वतः घटनास्थळी गेले. ती हद्द निगडीची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यामुळे अखेर दुपारी दोन वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला.