
राज्यातील खासगी विद्यापीठे अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचे हित सांभाळते, मात्र सरकारी आणि निमसरकारी विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना एटीकेटीची संधी दिली जात नाही. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची संधी दिली जावी आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी युवासेनेने कालिना विद्यापीठात जोरदार आंदोलन केले होते. या आंदोलनाला आणि पाठपुराव्याला यश आले असून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी एटीकेटीची संधी देण्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे.
शिवसेना-युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेना सिनेट सदस्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस येथे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एटीकेटी मिळावी यासाठी पालकांसह आंदोलन केले होते. ते विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. या विषयावर चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या विद्यार्थ्यांना फक्त एक वर्षासाठी एटीकेटीची संधी देण्याची मागणी तत्त्वतः मान्य केली. या बैठकीला युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, मयूर पांचाळ, किसन सावंत, व्यवस्थापन परिषद सदस्य मिलिंद साटम, शिवसेना उपनेत्या शीतल शेठ-देवरुखकर, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य योगेश निमसे उपस्थित होते.
लवकरच जीआर काढणार
आंदोलन करणाऱया अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना फक्त एका वर्षासाठी एटीकेटीची संधी मिळाली आहे, मात्र युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनाही ही संधी दिली जाणार आहे. दरम्यान, याबाबत लवकरच जीआर काढून राज्यभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनाही एटीकेटीची संधी दिली जाणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.