हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांना मिळणार खूशखबर, इंग्लंडविरुद्धच्या टी-20 लढतींसाठी 50 टक्के क्षमतेने स्टेडियममध्ये प्रवेश देणार

कोरोना महामारीने सर्वच खेळांच्या स्पर्धांवर विरजण पडलेले आहे. या पार्श्वभूमीवर  देशात होणाऱया इंग्लंडविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेतील लढती क्रिकेट शौकिनांना याची देही याची डोळा प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन पाहायची संधी मिळणार आहे.

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही खूशखबर देण्यासाठी आग्रही आहे, पण 50 टक्के क्षमतेने स्टेडियममध्ये क्रिकेट रसिकांना प्रवेश देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी लागणार आहे, त्याच्या प्रतीक्षेत क्रिकेट बोर्ड आहे. सरकारची या निर्णयाला मंजुरी मिळवण्यासाठी बीसीसीआयचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

हिंदुस्थान  आणि इंग्लंड संघांमध्ये  5 फेब्रुवारीपासून कसोटी क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे, पण त्यानंतर मार्च महिन्यात हिंदुस्थानी क्रिकेट रसिकांसाठी  एक आनंदाची बातमी येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कसोटी मालिकेत हिंदुस्थानी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही, पण मार्च महिन्यामध्ये हिंदुस्थान पाहुण्या इंग्लंड संघाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.

या मालिकेत हिंदुस्थानी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळावा, यासाठी बीसीसीआय जोरदार प्रयत्न करीत आहे, पण यामध्ये एक समस्या असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे. ही अडचण दूर होऊन चाहत्यांना या वेळी एक सरप्राइज गिफ्ट मिळेल, अशी आशा देशातील सर्वच क्रिकेटप्रेमींना आहे.

काय आहे बीसीसीआयपुढील मोठी अडचण

‘हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यामधील टी-20 मालिकेपासून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात यावा, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. स्टेडियममध्ये किती प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा, याबाबतही बीसीसीआय विचार करीत आहे, पण त्यासाठी बीसीसीआयला सरकारच्या परवानगीची गरज आहे.

सरकारच्या परवानगीशिवाय बीसीसीआयला प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे सरकारने जर परवानगी दिली तर चाहत्यांसाठी आम्ही प्रवेश खुला करू शकतो’ असे बीसीआयच्या अधिकाऱयाने स्पष्ट केले आहे.

कोणताही धोका नको म्हणून सुरुवातीचे कसोटी सामने प्रेक्षकांविनाच खेळवणार 

कोरोनाचे सावट पाहता या वेळी फक्त स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे आता सरकारच्या परवानगीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता बीसीसीआयने हिंदुस्थान आणि इंग्लंड मालिकेत खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करता कोणताही धोका न पत्करण्याचे ठरवले आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा निर्णय आधीच घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या