27 वर्षानंतर इंग्लंड वर्ल्डकप फायनलमध्ये दाखल, ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

120

सामना ऑनलाईन । बर्मिंघम

बर्मिंघमच्या एजबस्टन मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या सेमी फायनल लढतीत यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने दारूण पराभव करत फायनलमध्ये धडक दिली आहे. तीन बळी घेऊन ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडणाऱ्या क्रिस वोक्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 1992 नंतर तब्बल 27 वर्षांनी इंग्लंड वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. फायनलमध्ये इंग्लंडसमोर केन विलियम्सनच्या न्यूझीलंड संघाचे आव्हान असणार आहे. 14 जुलैला ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर फायनलचा सामना रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 224 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि बेअरस्टोने 100 धावांची सलामी दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागिदारी झाली. जॉनी बेअरस्टो 34 धावांवर बाद झाल्यावर ही जोडी फुटली. त्यानंतर जेसन रॉयने 9 चौकार आणि 5 षटकारांसह 85 धावांची खेळी केली. पंचांच्या एका खराब निर्णयामुळे त्याचे शतक हुकले. यानंतर कर्णधार मॉर्गन आणि रूटने आणखी पडझड न होऊ देता सामना खिशात टाकला. रुट 49 आणि मॉर्गन 45 धावांवर नाबाद राहिला.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडपुढे विजयासाठी 224 धावांचे आव्हान ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवर वॉर्नर आणि फिंच स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर पहिला सामना खेळणारा हँडस्कोम्बही 4 धावांवर बाद झाल्याने त्यांची अवस्था तीन बाद 14 झाली. यानंतर अॅलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथने 100 धावांची भागिदारी करत डाव सावरला. परंतु राशिदने सलग दोन धक्के देत ऑस्ट्रेलियाला पुन्हा बँकफूटवर ढकलले. स्मिथने एकाकी झुंज देत 85 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून वोक्स आणि राशिदने प्रत्येकी 3 बळी घेतले, तर जोफ्रा आर्चरने 2 आणि मार्क वूडने एक बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या