अपेक्षेप्रमाणे इंग्लंडचा धडाकेबाज संघच मुल्तान कसोटीचा सुल्तान ठरला. त्यांनी पाकिस्तानचा उर्वरित संघ अवघ्या दीड तासात गुंडाळत एक डाव आणि 47 धावांनी मुल्तान कसोटी जिंकली. पराभवाने खचलेल्या पाकिस्तानला आता आपल्या घरातही विजय मिळवणे अवघड होऊन बसलेय. गेल्या अडीच वर्षांत त्यांना आपल्या घरात सलग 11 कसोटींत विजयपासून दूर राहावे लागले आहे. मात्र इंग्लंड या ऐतिहासिक विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्रिशतकवीर ब्रुक या विजयात सामनावीर ठरला.
काल ज्यो रूट आणि हॅरी ब्रुक यांच्या विश्वविक्रमी भागी आणि खेळींमुळे इंग्लंडने 823 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर इंग्लिश गोलंदाजांनी पाकिस्तानची 6 बाद 82 अशी दुर्दशा करत आपला विजय निश्चित केला होता आणि आज त्यावर जॅक लिचच्या फिरकीने शिक्कामोर्तब केले. कालची नाबाद जोडी सलमान आगा (63) आणि आमीर जमाल (ना. 55) यांनी आपल्या भागीत 39 धावांची भर घातली. दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागी केली. लिचने ही भागी पह्डली आणि त्यानंतर शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांनाही एकाच षटकात बाद करत संघाला विजय मिळवून दिला. अकरावा फलंदाज अबरार अहमद फलंदाजीलाच उतरला नाही आणि पाकिस्तानचा डावाने पराभव झाला.
सलग 11 कसोटींत पाकिस्तान विजयाविना
मायदेशात सारेच संघ वाघ असतात; पण पाकिस्तानचा मायदेशात चक्क बकरा झाला आहे. 2021 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा सलग दोन कसोटींत पराभव करत मालिका जिंकली होती; मात्र त्यानंतर ते सलग 11 कसोटी खेळलेत, पण एकातही त्यांना विजय मिळवता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी ड्रॉ सुटल्यानंतर लाहोर कसोटी पाकिस्तान 115 धावांनी पराभूत झाला. त्यानंतर त्यांच्या पराभवाची मालिका नॉनस्टॉप आहे. सलग चार कसोटी पराभवानंतर न्यूझीलंडविरुद्ध दोन्ही कसोटी ड्रॉ राहिल्या. मात्र गेल्याच महिन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 2-0 ने धुव्वा उडवत खळबळ माजवली.
पहिल्या डावात 500 धावा करूनही डावाने पराभव
पहिल्या डावात 500 धावा केल्यानंतर कसोटी इतिहासात एकही संघ डावाने हरला नव्हता. अखेर पाकिस्तानने तो दुर्मिळ आणि दुर्दैवी विक्रम स्वतःच्या नावावर केला. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. तसेच कसोटीच्या पहिल्या डावात सर्वाधिक 556 धावा करूनही पराभूत संघ म्हणून पाकिस्तान आता तिसऱया क्रमांकावर पोहोचला आहे.