
सलग दोन पराभवांनी खचलेल्या इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेवर तब्बल 342 धावांनी विजय मिळवत वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. या विजयानं इंग्लंडनं हिंदुस्थानचा विश्वविक्रमही मागे टाकला. याआधी हिंदुस्थानने श्रीलंकेवर 317 धावांनी विजय मिळवला होता. आता दोन्ही संघात टी-20 मालिका सुरू होईल.
इंग्लंडने जो रूट आणि जेकब बेथेल यांच्या शतकांच्या जोरावर 50 षटकांत 5 गडी गमावून 414 धावांचा डोंगर उभारला होता. अनुभवी जो रूटने कारकीर्दीतील 19वे शतक साजरे केले. तर उदयोन्मुख खेळाडू जेकब बेथेलने आपल्या पहिल्या शतकाला गवसणी घातली. या दोघांनी तिस्रया विकेटसाठी तब्बल 182 धावांची भागीदारी करत संघाला भक्कम पाया दिला. शेवटी जोस बटलरने केवळ 32 चेंडूत 62 धावांची झंझावाती खेळी करत इंग्लंडचा डाव 414 पर्यंत नेला आणि आफ्रिकेसमोर 415 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.
दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडचे आव्हान पेललेच नाही. त्याची फलंदाजी सुरुवातीपासूनच कोलमडली. जोफ्रा आर्चरनं घातक मायाची सुरुवात करत एडन मार्करम आणि रीयान रिकल्टनला सलग मेडन ओव्हर्समध्ये तंबूत धाडलं. त्याला ब्रायडन कार्सनंही उत्तम साथ दिली.
दुखापतीमुळे कर्णधार टेम्बा बावुमा मैदानात उतरू शकला नाही, यामुळे आफ्रिकेची अवस्था अधिकच बिकट झाली.यानंतर आदिल राशिदनं लेगस्पिनच्या जादूवर तीन विकेट टिपत खालच्या फळीला उद्ध्वस्त केलं आणि इंग्लंडनं 342 धावांनी दणदणीत विजय निश्चित केला.
विक्रमांची नोंद
- हा विजय इंग्लंडच्या इतिहासातीलच नव्हे, तर वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा धावांनी विजय ठरला.
- आफ्रिकेच्या वनडे इतिहासातील ही सर्वात मोठी पराभवाची नोंद ठरली.
- विशेष म्हणजे, याआधीचा त्यांचा दुस्रया क्रमांकाचा सर्वात मोठा पराभवही गेल्या महिन्यातच ऑस्ट्रेलियाकडून झाला होता.