पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर लॉजवर राहण्याची नामुष्की, इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंची गैरसोय

2378

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) तिजोरीत सध्या खडखडाट आहे. कुठलाही प्रायोजक नसल्याने त्यांच्यापुढे सध्या आर्थिक संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची गैरसोय होत असून, त्यांच्यावर तेथे लॉजवर राहण्याची नामुष्की ओढावली आहे.

पाकिस्तानी क्रीडा पत्रकार साज सादीकने आपल्या ट्विटर हॅण्डलवर ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाणाऱ्या क्रिकेट संघाची पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येते. मात्र, ‘पीसीबी’कडे सध्या प्रायोजक नसल्याने त्यांच्या क्रिकेटपटूंवर लॉजवर राहण्याची वेळ आली आहे. ‘पीसीबी’चा मुख्य प्रायोजक असलेल्या पेप्सी कंपनीसोबतचा करार संपुष्टात आला असून, त्यांना अद्यापि दुसरा प्रायोजक मिळालेला नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात गेलेला पाकिस्तानी संघ शाहिद आफ्रिदी फौंडेशनचा लोगो लावून खेळणार आहे. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानातील स्थानिक ब्रॉडकास्टर पीटीव्हीने इंग्लंड-पाकिस्तान सामन्यांचे प्रक्षेपण करण्यास असमर्थता दर्शवली आहे. इंटरनॅशनल ब्रॉडकास्टरने पीटीव्हीला सामन्याची लिंक देण्यास नकार दिला आहे. आधीच्या सामन्यांचे थकलेले पैसे भरा अशी मागणी इंटरनॅशनल ब्रॉडकास्टरने केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही या प्रकरणात आपले हात वर करत पीटीव्हीला स्वतः यातून मार्ग काढण्यास सांगितले आहे. पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी व तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ५ ऑगस्टपासून ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या