हिंदुस्थानचे स्टार फलंदाज पुन्हा ढेपाळले

फोटो - बीसीसीआय

सामना ऑनलाईन । लंडन

पहिल्या कसोटीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या हिंदुस्थानच्या फलंदाजांनी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही सुमार कामगिरी केली. मुरली विजय (०), लोकेश राहुल (८ धावा), चेतेश्वर पुजारा (१ धाव), विराट कोहली (२४ धावा), हार्दिक पांडय़ा (११ धावा), दिनेश कार्तिक (१ धाव), अजिंक्य रहाणे (१८ धावा) या स्टार फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे हिंदुस्थानची दैना उडाली. जेम्स ऍण्डरसन, ख्रिस वोक्स व सॅम करण यांच्या भेदक गोलंदाजीसमोर हिंदुस्थानच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा हिंदुस्थानने ७ बाद ८४ धावा केल्या होत्या. यावेळी रविचंद्रन अश्विन १७ धावांवर खेळत होता.

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे हायलाईटस पाहा

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिल्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नसल्यामुळे या खेळपट्टीवर गोलंदाज वर्चस्व गाजवतील ही काळय़ा दगडावरील रेघ होती. जेम्स ऍण्डरसन याने पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर मुरली विजयचा त्रिफळा उडवून टीम इंडियाला शून्यावरच पहिला धक्का दिला. त्यानंतर जेम्स ऍण्डरसनने सातव्या षटकात लोकेश राहुलला यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टॉकरवी झेलबाद केले. त्याला फक्त आठच धावा करता आल्या. कर्णधार विराट कोहली व कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हिंदुस्थानने तिसरा फलंदाज गमावला. चेतेश्वर पुजाराला एक धावेवर धावचीत झाला.

पुजारा, कुलदीपला चान्स, उमेश, धवनला वगळले

पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर हिंदुस्थानने दुसऱ्या कसोटीत दोन बदल केले. पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या शिखर धवनऐवजी चेतेश्वर पुजाराला संघात स्थान देण्यात आले. तसेच वेगवान गोलंदाज उमेश यादवऐवजी डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची टीम इंडियात एण्ट्री झाली.