हिंदीनंतर इंग्रजी सर्वाधिक बोलली जाते; मराठी भाषिक तिसऱ्या स्थानावर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानात हिंदी या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेनंतर दुसरी भाषा म्हणून इंग्रजी सर्वात अधिक बोलली जाते असे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र आणि गोव्याची मराठी बोली  बोलणाऱ्या नागरिकांचे प्रमाण हिंदी, बंगालीनंतर तिसरे आहे. विशेष म्हणजे इंग्रजी बोलणाऱ्या नागरिकांचे सर्वाधिक प्रमाण शहरी आणि श्रीमंतांत आहे असे आढळून आले आहे. ग्रामीण भागातले 3 टक्के लोकच इंग्रजी बोलू शकतात, तर शहरी  भागात हे प्रमाण 12 टक्के आहे. लोक फाऊंडेशन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्व्हेत हे स्पष्ट झाले आहे.

 हिंदुस्थानात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे, पण जागतिक भाषा म्हणून इंग्रजी शिकणाऱ्या आणि ती बोलणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. विशेषतः इंग्रजीचा वापर शहरी भागात मोठ्या प्रमाणात होतो. ग्रामीण भागात मात्र हे प्रमाण अद्याप नगण्यच आहे. शिवाय श्रीमंत आणि धनाढय़ांत इंग्रजी बोलण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. उच्चवर्णीयांचा इंग्रजीकडे अधिक ओढा असल्याचे उघड झाले आहे.

हिंदी भाषिकांची संख्या देशात सर्वाधिक 

हिंदुस्थानात हिंदी भाषा बोलणारे नागरिक 52.8 कोटी इतके आहेत. हिंदीत भोजपुरी या लोकप्रिय बोलीभाषेसह पन्नासहून अधिक बोलीभाषांचा समावेश आहे. देशात भोजपुरी बोलणारे 5  कोटी नागरिक आहेत. हिंदीपाठोपाठ प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या नागरिकांत बंगाली दुसऱ्या तर मराठी आणि तेलुगू भाषिक तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र मराठी भाषा बोलणारे नागरिक दुसरी आणि तिसरी भाषा म्हणून अनुक्रमे हिंदी व इंग्रजीचा वापर अधिक करतात असे दिसून आले आहे.

जाती, धर्म, विभागानुसार भाषांचे महत्त्व 

इंग्रजी बोलणाऱ्या नागरिकांत 15 टक्के ख्रिस्ती असून 6 टक्के हिंदू आहेत, तर 4 टक्के नागरिक मुस्लिम आहेत. इंग्रजी बोलणाऱ्यांत महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. दक्षिणेकडील राज्यांत तर  प्रादेशिक भाषेनंतर दुसरी भाषा म्हणून हिंदीपेक्षा इंग्रजीलाच वापरात अग्रक्रम देण्यात येतो. उच्च जातीचे नागरिक इंग्रजी बोलणे जास्त पसंत करतात. त्या मानाने मागासवर्गात इंग्रजी बोलणाऱ्यांचे प्रमाण तसे फारच कमी आढळते. उत्तर हिंदुस्थानात मात्र हिंदीला प्राधान्य आणि इंग्रजीला दुय्यम स्थान अशी स्थिती आहे असे या सर्वेक्षणात उघड झाले आहे.