पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा

490

”संकट मोठे आहे… पावसाने होत्याचे नव्हते केलंय… पण, भावांनो धीर सोडू नका… खचून जाऊ नका. शिवसेना आहे, सरकारच्या माध्यमातून तुम्हांला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा आश्वासक दिलासा राज्याचे पर्यावरण मंत्री व पालकमंत्री रामदास कदम यांनी आज थेट बांधावर येऊन लोहगांव व नरसी येथील शेतकऱ्यांना दिला.

बेमोसमी पावसाच्या तडाख्याने शेतशिवारांचे प्रचंड नुकसान झाले असून मोठया कष्टाने जोपासलेली पिके ऐन काढणीला येताच झालेल्या अतिवृष्टीने डौलदार पिकांची अक्षरशः राखरांगोळी होऊन शेतकऱ्यांना जबर अर्थिक फटका बसला आहे. या अस्मानी संकटामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून अशावेळी मायबाप सरकार धावून येईल या आशेने शेतकरी मदतीची वाट पाहत आहे.

याच आशेला आश्वासक धोरणाचे स्वरुप देण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी लोहगांव व नरसी येथील नुकसानग्रस्त शिवारांची पाहणी केली.अक्षरशः पाण्यात बुडालेली सोयाबीनचे पिके व कापसाची अवस्था बघून पालकमंत्री कदम स्तब्ध झाले. प्रचंड चिखलातून वाट काढत बांधावर आलेल्या कदम यांनी मारुती मोरे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी बहरलेल्या शेतीची पावसाने अतिशय वाईट अवस्था केल्याचे सांगितले. खरीपाची पिके तर गेलीच पण आता रब्बी पिके देखील घेता येतील की नाही? याची चिंता शेतकऱ्यांना पालकमंत्री कदम यांच्यासमोर व्यक्त केली. शेतातील वाया गेलेल्या पिकांची कदम यांनी माहिती घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हे संकट खूप मोठे आहे. नुकसान देखील प्रचंड आहे. पण तुम्ही खचू नका, धीर ठेवा. या संकटकाळी शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी असून सरकारच्या माध्यमातून तातडीने योग्य मदत देण्यासाठी आम्ही भाग पाडू, असा दिलासा पालकमंत्री रामदास कदम यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या