Pulwama Attack- ताफ्यातील दोन गाड्यांच्या मधोमध घडवायचा होता स्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीनगर

पुलवामा जिह्यात गुरुवारी ‘जैश- ए-मोहम्मद’चा दहशतवादी आदिल दार याला ताफ्यामधील दोन गाड्यांच्या मधोमध हल्ला घडवून आणण्याचा होता. असा हल्ला झाला असता तर आता झाले त्यापेक्षा कितीतरी अधिक हिंदुस्थानी जवान शहीद झाले असते. मात्र सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीच्या (आरओपी) जवानाने त्याचा हा डाव हाणून पाडला. त्यामुळे चवताळलेल्या दारने ताफ्यातील सीआरपीएफच्या गाडीला धडक देऊन भीषण असा स्फोट घडवून आणला.

ताफ्याची गती धिमी झाली आणि…
सीआरपीएफ जवानांच्या ताफ्याच्या पुढे काही ट्रक जात होते. या ट्रकना मार्गातून बाजूला करून ताफ्याचा मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे ताफ्याची गती मंदावली आणि याचदरम्यान दहशतवाद्याने डाव साधला. त्यामुळे या पुढे जवानांचा ताफा जात असलेला रस्ता पूर्णपणे मोकळा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयईडी नाही तर हायग्रेड आरडीएक्सचा वापर
हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी 200 किलो आयईडी असलेली स्फोटके वापरली अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होती, मात्र आता आत्मघाती हल्ल्यासाठी 80 किलो अत्यंत उच्च क्षमता असलेले आरडीएक्सही वापरण्यात आले असावे असे लष्कराचे म्हणणे आहे. हल्ल्यासाठी अत्यंत उच्च क्षमतेच्या आरडीएक्सचा वापर करण्यात आला. हल्ल्यात चक्काचूर झालेल्या आणि इतर बसच्या सांगाड्यांच्या अभ्यास केल्यावर त्यात आयईडीचा वापर झाला नसल्याचे समोर आले आहे. असा भयंकर हल्ला केवळ उच्च क्षमतेच्या आरडीएक्सचा वापर करूनच केला जाऊ शकतो, असा अंदाज गुप्तचर विभागाने व्यक्त केला आहे.

पाचव्या बसवर केला हल्ला
सीआरपीएफच्या ताफ्यात 78 गाड्या होत्या. त्यात 16 बुलेटप्रूफ वाहने होती. दहशतवादी काकापोरा-लेलहर मार्गावरून आला. त्यामुळे त्याला ताफ्याच्या अगदी समांतर जाणे शक्य झाले. त्याने ताफ्यातील पाचव्या क्रमांकाच्या गाडीवर हल्ला केला. त्यात गाडीतील 39 जवान आणि ‘आरओपी’चा एक जवान असे एकूण 40 जवान शहीद झाले.