
प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुस्थानात आलेले युरोपीय महासंघाचे (EU) नेते आणि हिंदुस्थान यांच्यातील राजनैतिक संबंध केवळ करारांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत, तर ते खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून अधिक घट्ट झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्या सन्मानार्थ एका शाही मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात वाढलेला अस्सल ‘हिमालयीन मेन्यू’.
हिमाचल प्रदेशातील कसौली येथील प्रसिद्ध शेफ प्रतीक साधू आणि शेफ कमलेश नेगी यांनी हा विशेष मेन्यू तयार केला होता. कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्य हिंदुस्थानच्या खाद्यपरंपरांचा यात समावेश होता.
मेनूमधील काही खास आकर्षणे:
सुरुवात (Appetizers): उत्तराखंडचे ‘जखिया आलू’ आणि हिरव्या टोमॅटोची चटणी, सोबत मेघालयातील बेरी सॉल्टने सजवलेली ‘झंगोरा की खीर’.
सूप आणि स्टार्टर्स: मुन्सियारी (उत्तराखंड) मधील ‘सुंदरकला थिचोनी’ हे बकव्हीट नूडल्सचे सूप, ज्यावर तिबेटी संस्कृतीचा प्रभाव होता. यासोबत ‘याक चीज कस्टर्ड’ आणि भांग माठरी (Hemp crisp) वाढण्यात आली.
कुमाऊनी कोशिंबीर: ‘लिंबू सान’ ही कुमाऊनी पद्धतीची कोशिंबीर, ज्यात डोंगराळ लिंबू, हिरवा लसूण, दही आणि सुगंधी मीठ यांचा वापर केला होता.
मुख्य जेवण: कश्मिरी गुच्छी (मोरेल्स) आणि सोलन येथील मशरूम्सची भाजी, सोबतीला हिमाचलचा ‘स्वर्णू भात’ आणि कश्मिरी अक्रोडची चटणी.
मिष्टान्न (Dessert): हिमालयीन नाचणी (Ragi) आणि कश्मिरी सफरचंदाचा केक, आसाममधील दिमा हासाओ येथील कॉफीपासून बनवलेले कस्टर्ड आणि हिमालयीन मध लावलेले ‘पर्सीमन’ फळ.
राजकारण आणि फॅशनचा मेळ
या भेटीदरम्यान हिंदुस्थान आणि युरोपीय महासंघामध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम झाला, ज्याला ‘सर्व करारांची जननी’ म्हटले जात आहे. केवळ जेवणच नाही, तर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी परिधान केलेल्या हिंदुस्थानी पेहरावानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी हिंदुस्थानी डिझायनर्सनी तयार केलेले पिवळ्या रंगाचे कुर्ता जॅकेट आणि बांधणीचा स्कार्फ परिधान केला होता.
शेफ प्रतीक साधू यांच्या ‘NAAR’ या रेस्टॉरंटने नुकतेच आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये स्थान मिळवले आहे, ज्याची झलक या मेजवानीतही पाहायला मिळाली.
himalayan cuisine for eu leaders at rashtrapati bhavan state banquet
president droupadi murmu hosted a state banquet for eu leaders featuring a curated himalayan menu by chef prateek sadhu. explore the flavors of kashmir, ladakh & uttarakhand.



























































