
युरोपियन फुटबॉलचा सर्वात मोठा सोहळा युरो कप 2028 चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अवघ्या ब्रिटनमध्ये फुटबॉलप्रेमींचा उत्साह दुणावला आहे. इंग्लिश प्रीमियर लीगच्या थराराला सरावलेली ही भूमी आता पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम खेळाडू आणि फुटबॉल संस्कृतीच्या खऱ्या खेळाची साक्षीदार होणार आहे. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि आयर्लंड या चार राष्ट्रांच्या संयुक्त आयोजनात ही भव्य स्पर्धा रंगणार असून युरोपभरातील चाहत्यांसाठी आणि लाखो पर्यटकांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरणार आहे.
स्पर्धेचा शानदार प्रारंभ 9 जूनला कार्डिफमध्ये होणार आहे. उत्साही आणि फुटबॉलप्रेमी वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या वेल्सच्या या राजधानीत उद्घाटनचा सामना होणार असल्याने शहराने सजावट, वाहतूक आणि पर्यटन सेवांमध्ये मोठय़ा तयारीला सुरुवातही केली आहे. कार्डिफचे फुटबॉल संस्कार पर्यटकांसाठीही अनोखे आकर्षण ठरणार आहेत.
स्पर्धेचा अंतिम सामना 9 जुलैला वेम्बली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. फुटबॉलची मक्का मानल्या जाणाऱ्या वेम्बलीवर उपांत्य फेरी आणि उपउपांत्य सामनाही ठेवण्यात आला आहे. इंग्लंडने नुकत्याच युरो कपमध्ये उपविजेतेपद मिळवल्याने वेम्बलीवर पुन्हा मोठा महामुकाबला पाहण्यास चाहत्यांची विशेष उत्सुकता आहे.
युरो 2028 मध्ये एकूण 24 देश, 51 सामने आणि 8 शहरांतील 9 महाकाय स्टेडियम्स यांचा समावेश आहे, बार्ंमगहम, डब्लिन, ग्लासगो, लिव्हरपूल, मँचेस्टर आणि न्यू कॅसल या शहरांसह चारही यजमान देशांचा यात सहभाग आहे. युरो 2028 साठीच्या पात्रता फेऱ्यांमध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि आयर्लंड सहभागी होणार असले तरी गरज पडल्यास दोन स्थानं यजमानांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. 6 डिसेंबर 2026 रोजी पात्रता सोडत बेलफास्टमध्ये होणार आहे.
























































