
पनवेलच्या मतदार यादीमध्ये तब्बल ११ हजार ४६० दुबार मतदार आढळून आले आहेत. या मतदारांकडून हमीपत्र घेण्यासाठी निवडणूक विभागाने प्रत्यक्ष क्षेत्रीय मोहीम हाती घेतली असून पुढील काही दिवसांत निवडणूक घरोघरी भेटी देऊन विभागाचे कर्मचारी संबंधित मतदारांकडून एका मतदान केंद्राची निवड निश्चित करून घेणार आहेत. महापालिकेने प्रारूप यादी जाहीर केल्यानंतर यादीत २१ हजार १६२ दुबार नावे असल्याची तक्रार करण्यात आली होती. यादीची छाननी केल्यानंतर दुबार मतदारांचा आकडा पालिकेने जाहीर केला आहे. हमीपत्र देऊनही दोन ठिकाणी मतदान केले तर संबंधित मतदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे
पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या ५ लाख ५४ हजार ५७८ मतदारांच्या प्रारूप यादीवर २९ हजार ४०६ हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये स्वतः मतदारांनी नोंदविलेल्या ५ हजार ५२६ तर इतरांनी नोंदविलेल्या १२ हजार ८५२ हरकतींचा समावेश होता. दुबार व संशयास्पद मतदारांबाबत एकूण २१ हजार १६२ हरकती प्राप्त झाल्या. तसेच ९४५ मृत मतदारांची नावे यादीत असल्याचाही दावा करण्यात आला होता. या हरकतीनंतर निवडणूक विभागाने सॉफ्टवेअर प्रणालीच्या मदतीने छायाचित्रांची तुलना, नावे, पालकांची माहिती आणि पत्ता यांची पडताळणी केली. ही प्रक्रिया १९ पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली राबविण्यात आली. तपासणीनंतर ११ हजार ४६० मतदार दुबार असल्याचे स्पष्ट झाले. या मतदारांना दोनपैकी कोणत्या एका मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे याबाबत विकल्प स्वरूपाचे हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. जे मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सापडणार नाहीत किंवा माहिती देणार नाहीत, त्यांच्याकडून मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्रावर हमीपत्र घेतले जाणार आहे. हमीपत्र दिल्यानंतरही एखाद्या मतदाराने दोन ठिकाणी मतदान केल्याचे आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे, असा इशारा निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिला आहे.

























































