
यंदा ऐन मे महिन्यापासूनच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगफुटीसदृश पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला. त्या नुकसानीचे पंचनामे होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी अद्यापि शेतकऱ्यांच्या हातात नुकसानभरपाईची फुटकी कवडीही मिळालेली नाही. जिह्यातील 10 हजार 284 शेतकऱ्यांचे एक हजार 869 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, तब्बल तीन कोटी 45 लाख नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालाला अद्यापि मंजुरीच मिळालेली नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत दिवस काढत असल्याचे चित्र आहे.
यंदा मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन उन्हाळ्यात मे महिन्याच्या मध्यापासूनच जोरदार पावसाने जिह्यात हजेरी लावली. सर्वच ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीला त्याचा मोठा तडाखा बसला. शासनाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे सोपस्कार पार पडले. शासनाच्या निकषानुसार झालेल्या पंचनाम्यात जिह्यातील एक हजार 869 हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसून 10 हजार 284 शेतकऱ्यांचे सुमारे तीन कोटी 45 लाख 38 हजार 755 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद झाली.
यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने सर्वाधिक नुकसान शिरोळ तालुक्यात झाले असून, 505.27 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ पन्हाळा तालुक्यातील 358, तर करवीर तालुक्यातील 305 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसंदर्भात शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे; पण अडीच महिने झाले, तरी यावर कसलाच निर्णय झाला नाही. त्यामुळे नुकसानभरपाईविना शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरण्यांचाही आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यात शासनाच्या निकषानुसार राष्ट्रीय व राज्य आपत्ती नुकसानभरपाईचे निकष पाहता, नुकसान 33 टक्क्यांपेक्षा अधिक झाले असेल, तरच भरपाई मिळते. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही भरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे.