तळागाळातील प्रत्येकाला हक्काचे घरकुल देण्यासाठी काम करणार : जयदत्त क्षीरसागर

412

प्रधानमंत्री आवास योजना सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. 2022 पर्यंत या योजनेतून सगळ्यांना घर दिले जाईल. बीडमधील प्रत्येक गरीब बेघर व्यक्तीस स्वतःच्या हक्काचे घरकुल देण्याचे काम केले जात असून त्यांचे घराचे स्वप्न यातून पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. बीड नगरपरिषदेच्या सभागृहात सोमवारी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण क्षीरसागर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी क्षीरसागर बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक विजय नाईक, मध्यवर्ती बँकेचे दिलीप परदेशी, क्रेडाईचे समीर काझी, बीड न.प.चे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर तसेच बबन शिंदे, सादिक भाई, अरुण डाके, विनोद मुळुक आदी उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, या प्रधानमंत्री आवास योजनेतून बीड शहरात मोठे काम होत असून यातील लाभार्थ्यांना लाभाचे धनादेश दिले जात आहेत. तसेच योजनेतून अधिक घरकुले तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विविध शासकीय जमिनी तसेच गायरान जागा देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यस्तरावरून या अनुषंगाने बीड येथील प्राप्त होणारे पात्र प्रस्ताव मंजूर करण्याबाबत प्रधान सचिव संजीव कुमार यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. सर्वांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करून घरकुलाचे प्रकल्प मार्गी लागावे. याअनुषंगाने क्रेडाई सारख्या बांधकाम संघटनांचे योगदान घेतले जाईल. त्यांना प्रोत्साहन म्हणून वाढीव एफएसआय दिला जातो नगरपरिषदेने यापूर्वी शासनाच्या जागेवर झोपडी घरे बांधून राहणाऱ्या व्यक्तींना घरे जागा त्यांच्या मालकी हक्काने देण्याबाबत मोहीम राबवावी असे सांगून ते म्हणाले. गरजूंना अन्न, वस्त्र, निवारा मिळावा यासाठी शासन काम करत असून सर्वांना शिधापत्रिका दिल्या जाव्यात. यासाठी मोहीम राबवली जात आहे तसेच प्रत्येक कुटुंबास गॅस जोडणी मिळण्यासाठी उज्वला गॅस योजनेतून जोडण्या दिल्या जात आहे.

शहराच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण ठरणारे अनेक उपक्रम राबवण्यात आले असून मागील काळात क्रीडांगण विकास करण्यात आला. त्याचा मोठा फायदा नागरिकांना होत आहे. याचबरोबर अहमदनगर- बीड- परळी रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग 211 चे नियोजन करून तो पूर्ण करतांना शहराबाहेरून बायपास मार्ग काढण्यात आला. त्यामुळे देखील बीड शहराबाहेरील परिसराचा वेगात विकास झाला. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी मूलभूत कामांवर भर दिला जात असून महिला खेळाडूंसाठी सुविधा निर्माण करणे. ओपन जिम निर्माण करणे, वीज पुरवठ्याची संबंधित ट्रान्‍सफार्मर व वीजवाहक तारांचे दुरुस्ती व नवीन कामे करण्यासाठी 14 कोटींची तरतूद केली आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी साडेतीनशे खाटांचे रुग्णालय आणि विविध ठिकाणी पब्लिक हेल्थ युनिट निर्माण करणे अशी कामे केली जात आहेत असे त्यांनी सांगितले. हवामान बदल होत असून राज्यातील काही जिल्ह्यात महापूर असताना आपल्या बीडमध्ये पाऊस नाही . यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सोलापूरच्या धर्तीवर रडार यंत्रणा येथे उभी करणे, नदीजोड प्रकल्पामार्फत कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा नदीच्या पात्रात आणणे अशा प्रकल्पांवर काम केले जात आहे. या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्यास काही वर्षे लागणार आहेत पण त्याचा फायदा जिल्ह्याला मिळेल, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या