हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आई माला अंकोला यांचा पुण्यातील राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. त्यांचा गळा चिरलेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच माला यांनीच आपला गळा चिरला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
माला अंकोला या 77 वर्षाच्या होत्या. पुण्यात त्या आपल्या मुलीसोबत रहायच्या. शुक्रवारी प्रभात रोडवरील त्यांच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. माला अंकोला यांच्या घरातली मोलकरणी जेव्हा आली तेव्हा ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मोलकरीणीने दार उघडलं तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह पडला होता. त्यांच्याच हाताने त्यांनी आपला गळा चिरला असावा असे प्रथमदर्शनी दिसत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून माला अंकोला यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती असेही पोलिसांनी नमूद केले आहे.