
टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन याची नवीन इनिंग सुरू झाली आहे. तेलंगणा सरकारमध्ये अझरुद्दीन याने कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शुक्रवारी राजभवनामध्ये हा शपथविधी आयोजित करण्यात आला होता. यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अझहरच्या समावेशामुळे तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 16 झाली आहे.
मोहम्मद अझरुद्दीन याने 2009 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्याने काँग्रेसकडून लोकसभा निवडणूकही लढली होती. मात्र मुरादाबाद मतदारसंघातून त्याला पराभव सहन करावा लागला. त्यानंतर 2018 मध्ये त्याला तेलंगणा काँग्रेस राज्य समितीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली. त्यानंतर 2023 मध्ये त्याने ज्युबिली हिल्स मतदारसंघातून त्याने विधानसभा निवडणूक लढली, पण तिथेही त्याचा पराभव झाला. त्यानंतर त्याला विधान परिषदेत आमदारकी देण्यात आली आणि आता मंत्रिमंडळातही स्थान मिळाले.
#WATCH | Hyderabad, Telangana: Congress leader and former Cricketer Mohammad Azharuddin takes oath as Minister at Raj Bhavan. Governor Jishnu Dev Verma administers the oath to him.
(Video Source: I&PR Telangana) pic.twitter.com/oGRIydcCVe
— ANI (@ANI) October 31, 2025
दरम्यान, क्रिकेटचे मैदान सोडून राजकारणात येऊन नशीब आजमावणारा आणि मंत्री होणारा तो काही पहिलाच खेळाडू नाही. त्याच्याआधी नवज्योत सिंग सिद्धू, मनोज तिवारी, लक्ष्मी रतन शुक्ला आणि मनोहरसिंह जडेजा यांनीही मंत्रीपद भोगले आहे.
– नवज्योत सिंग सिद्धू यांनी 2017 मध्ये पंजाबच्या पूर्व अमृतसह विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यावेळी त्यांना पंजाब सरकारमध्ये पर्यटन मंत्री बनवण्यात आले होते. अर्थात 2019 मध्ये त्यांच्याकडून हे मंत्रीपद काढून घेण्यात आले.
– मनोज तिवारी याने 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याने शिबपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. बंगाल सरकारमध्ये त्याच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.
– अष्टपैलू लक्ष्मी रतन शुक्ला यांनी 1999 मध्ये हिंदुस्थानकडून तीन वन डे खेळल्या होत्या. 2016 मध्ये त्यांनी हावडा मतदारसंघातून आमदारकी जिंकली. ममता बॅनर्जी सरकारमध्ये त्यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी होती.
– मनोहरसिंह जडेजा काँग्रेसच्या गुजरात सराकारमध्ये तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. यावेळी त्यांनी अर्थमंत्री, आरोग्य मंत्रीपद भूषवले होते. त्यांनी टीम इंडियाकडून एकही सामना खेळला नाही, मात्र प्रथम श्रेणीच्या 14 लढतीत त्यांनी 614 धावा करत 5 विकेट्सही घेतलेल्या आहेत.
 
             
		




































 
     
    




















