
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेनेने भाजप नेत्यांना झोप येत नाही पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमच्या जिल्ह्यातील धर्मा पाटील नावाच्या शेतकर्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी भाजपच्या नेत्यांना पाझर का फुटला नाही असा सणसणीत सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी आज केला.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी भाजपचे नेते आता आकाशपातळ एक करीत आहे. पण धर्मा पाटील यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण याचा शोध घेण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले होते असा प्रश्न अनिल गोटे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केला. शेतकर्याने आपल्या कार्यालयात आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण करणार्यांना आपण शोधून काढले का असा प्रश्न उपस्थित केला. बिचार्या शेतकर्याच्या प्राणास काहीच किंमत नाही कारण त्यांना आत्महत्या करण्याची पाळी आणायला भाग पाडणारे आपल्या मंत्री मंडळातील सहकारी होते म्हणून आपण डोळ्यावर कातडे पांघरुन घेतले होते का अशी विचारणा त्यांनी भाजप नेत्यांना केली. आपल्या क्ष्रुद्र राजकीय स्वार्थासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यचे भांडवल करणे यालाच तर प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारा म्हणतात अशा शब्दात गोटे यांनी शाब्दिक हल्ला चढवला.
सीबीआय हे विरोधकांना छळण्यासाठी सरकारच्या हातातले बाहुले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना म्हणत होते याची आठवण यानिमित्ताने अनिल गोटे यांनी करून दिली. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास मागील सहा वर्षांपासून सुरु आहे. पण एखाद्या निश्चित व्यक्तीपर्यंत तपास पोहोचलेला नाही याकडेही गोटे यांनी यानिमित्ताने लक्ष वेधले.




























































